एसटी कामगारांचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ११८ कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं सदावर्तेंनी सांगितलं. तसेच पवारांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप केला. ते शुक्रवारी (७ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यात आली. त्यांना कष्टकऱ्यांप्रती कळवळा आहे. त्यासाठी त्यांचे ऋण व्यक्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला म्हणून ११८ कामगारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावरून उद्धव ठाकरे सरकारने त्यांना नोकरीवरून काढलं होतं.”

“अजित पवार कायम म्हणत होते की या कामगारांचे गिरणी कामगार होतील. विरोधी पक्षाचे पुढारी अजित पवार यांनी बघावं की, एकूण ९२ हजार कष्टकऱ्यांचाही गिरणी कामगार झाला नाही आणि ११८ कर्मचारीही डंके की चोटपर कामावर रुजू झाले,” असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.

हेही वाचा : “समाजात मोकळं सोडणं धोकादायक”, मुंबई पोलिसांच्या नोटीसवर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “यापुढे डंके की चोटपर…”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशिर्वादाने अत्यंत सन्मानपूर्वक पुन्हा सेवेत आलेत,” असंही गुणरत्न सदावर्तेंनी नमूद केलं.