वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवाजी पार्कवरील शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित केलाय. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका करत “कोणाच्या बापात दम आहे का बघतो” असं वक्तव्य केलं. ते शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) उस्मानाबादमध्ये स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीसाठी आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “कोणाच्या बापात दम आहे का बघतो. तुमच्यात दम असता तर शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरेंची समाधी केली असती. जे आतापर्यंत स्वतःच्या वडिलांना न्याय देऊ शकले नाही, ते काय श्रद्धा वालकरला न्याय देऊ शकतील, ते काय श्रद्धाचा आवाज होऊ शकतील. ते होणार नाही, आम्ही आवाज होऊ. ती आमची भगिनी होती.”
मुंबई वेगळी का हवी? गुणरत्न सदावर्ते म्हणाले…
मुंबई वेगळी का हवी? या प्रश्नावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “ज्याप्रमाणे पंजाबची राजधानी चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचप्रमाणे मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश केलं पाहिजे. मुंबई २४x७ सुरू ठेवायची असेल, तिचं स्वतंत्र्य आबाधित ठेवायचं असेल, जगाची आर्थिक राजधानी ठेवायची असेल तर मुंबई केंद्रशासित प्रदेश झाली पाहिजे.”
“माझ्या मागणीला ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी आणेंचाही पाठिंबा”
“मुंबई स्वतंत्र राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश करण्याच्या माझ्या मागणीला फेसबुकवर ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी आणे यांनीही पाठिंबा दिला आहे,” असंही सदावर्तेंनी नमूद केलं.
“छोटी राज्ये मानवी विकासाचं केंद्र होऊ शकतात”
ते पुढे म्हणाले, “छोटी राज्ये मानवी विकासाचं केंद्र होऊ शकतात. तिथं जलदगतीने विकास होऊ शकतो. एका ठिकाणी न्युरोसर्जन उपचार करतोय आणि गडचिरोलीला एखादा व्यक्ती पडला तर न्युरोसर्जन नसल्याने त्याचा मृत्यू होतोय. इथल्या पोलीस अधीक्षकांनी ऐकलं नाही, तर पोलीस महासंचालक मुंबईला असतात. तिकडे कोण जाणार? पोलीस महासंचालक इथल्या इथं मराठवाड्यात असतील तर त्यांच्यापर्यंत पोहचणं सोपं जाईल.”
“जशी तेलंगाणाने प्रत्येक जिल्ह्यात मंत्रिमंडळ बैठक ठेवली तशी बैठक छोटे राज्य झाल्यावर होईल. मराठा, धनगर, बौद्ध म्हणून नाही तर कष्टकरी म्हणून हा स्वतंत्र मराठवाड्याचा लढा आहे,” असं सदावर्ते यांनी सांगितलं.