एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी राजकीय भूमिका घेतली आहे. त्यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. दैनिक ‘सामना’तून रश्मी शुक्ला यांचं अप्रत्यक्षपणे खच्चीकरण होत असल्याचा आरोप, सदावर्ते यांनी केला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विविध मुद्द्यांवरून आसूड ओढले जातात. त्यातच फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीनचिट दिली आहे. मात्र, याचाच आधार घेत गुणरत्न सदावर्ते यांनी ‘सामना’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : मनसे आणि शिंदे गटाची युती? CM एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’वर भेट

“रश्मी शुक्ला यांचं ‘सामना’तून अप्रत्यक्ष नाहीतर प्रत्यक्षरित्या खच्चीकरण केलं जात आहे. दैनिक सामना बंद झाला पाहिजे, यासाठी आरएनआय ( रजिस्टार ऑफ न्यूजपेपर फॉर इंडिया ) कार्यालयाकडे मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगकडे तक्रार केली आहे. तर, ‘सामना’ प्रकाशित होऊ नये, म्हणून राज्य गृहमंत्रालयाने याची दखल घ्यावी,” अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

यावरती माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “‘सामना’वर कोणी बंदी आणू नाही शकत. त्यांना शिवसैनिक आणि न्यायालयीन लढाईशी ‘सामना’ करावा लागेल. ज्याला प्रसिद्धी हवी आहे, त्याने फक्त उद्धव ठाकरे आणि ‘सामना’वर बोलायचं हा एककलमी कार्यक्रम सुरु आहे,” असे प्रत्युत्तर किशोरी पेडणेकर यांनी सदावर्तेंना दिलं आहे.

हेही वाचा : आमदार राजू पाटील म्हणाले ‘मनं जुळली आहेत,’ आता मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर थेट एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर पक्षावर दावा सांगितला. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगापुढे गेल्यानंतर शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे आता ‘सामना’वर बंदीची कारवाई झाल्यावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो.