सोलापूर : नथुराम गोडसेंच्या विचाराने अखंड भारत निर्मितीचे स्वप्न साकार होण्यासाठी आपण जाहीरपणे भूमिका घेत असल्याची मुक्ताफळे एसटी कर्मचारी नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी उधळली आहेत.सोलापुरात बुधवारी आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ॲड. सदावर्ते यांनी अखंड भारताचा जयघोष केला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी महात्मा गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेच्या प्रतिमांसह अखंड भारताच्या नकाशाचे प्रदर्शन केले.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी सहकारी बँकेच्या निवडणुकीत ॲड. सदावर्ते यांनी स्वतःचे एसटी कष्टकरी संघर्ष पॕनेल उतरविले आहे.
या पॕनेलच्या प्रचारासाठी ते सोलापुरात आले होते. एसटी कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी तत्कालीन उध्दव ठाकरे यांच्या सरकारच्या विरोधात आंदोलन करणारे ॲड. सदावर्ते यांनी आता वर्षभर एकनाथ शिंदे-देवेंद्र फडवणीस यांचे सरकार असताना एसटी कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांचा दर्जा का मिळत नाही, या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे सदावर्ते यांनी टाळले. या प्रश्नावर सबुरीचा सल्ला देण्यासही ते विसरले नाहीत. एसटी कर्मचा-यांच्या मुख्य प्रश्नावर भाष्य करण्याऐवजी सदावर्ते यांनी महात्मा गांधीजींच्या मारेक-याचे नथुरामजी म्हणून गुणगान केले आणि अखंड भारताचा जयघोष केला.