इन्सुली जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गुरुनाथ पेडणेकर यांनी राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी उमेदवार उल्हास हळदणकर यांच्याविरोधात दोन हजार ३३२ मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या मतात घट झाली, तर मनसेचा उमेदवार शिवसेनेला वरचढ ठरत तिसऱ्या क्रमांकावर, तर शिवसेनेचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. हा विजय पालकमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली.
इन्सुली जिल्हा परिषद सदस्य कै. नंदू पेडणेकर यांच्या अकाली निधनाने ही निवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेसचे गुरुनाथ पेडणेकर यांना तीन हजार ८४८, राष्ट्रवादीचे उल्हास हळदणकर यांना एक हजार ५१६, मनसेचे गुरुदास गवंडे यांना ५८१ व शिवसेनेचे घनश्याम केरकर यांना ५५२ मते मिळाली. काँग्रेसचे बंडखोर तात्या वेंगुर्लेकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे जाहीर करूनही १८६ मते मिळाली.
काँग्रेसचे गुरुनाथ पेडणेकर यांनी राष्ट्रवादीचे उल्हास हळदणकर यांचा दोन हजार ३३२ मतांनी पराभव केला. हा राष्ट्रवादीला धक्का ठरला, तर मनसेचे उमेदवार गुरुदास गवंडे यांना शिवसेनेचे उमेदवार घनश्याम केरकर यांच्यापेक्षा २९ मते जास्त मिळाली. त्यामुळे शिवसेनेची या ठिकाणी घसरगुंडी होऊन लोकांनी मनसेला साथ दिल्याचे उघड झाले.
या जिल्हा परिषद मतदारसंघात सहा हजार ६८३ मतदान झाले होते. खरे तर १२ हजार ७९० मतदार या ठिकाणी नोंद झालेले आहेत. पण मतदान फारच कमी झाले असल्याने त्याचा फायदा काँग्रेसला होईल, असे बोलले जात असतानाच काँग्रेसचे गुरुनाथ पेडणेकर यांनी दणदणीत मताधिक्य मिळवून ठसा उमटविला. काँग्रेसचे उमेदवार गुरुनाथ पेडणेकर २४ केंद्रांवर आघाडीवर राहिले. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजू परब यांनी मडुरा भागात ६९५ मताधिक्य मिळवून दिले. त्यामानाने राष्ट्रवादीची मतघटता चिंताजनक ठरली. गुरुनाथ पेडणेकर यांनी पोटनिवडणुकीत मिळविलेला विजय काँग्रेसच्या एकसंधतेचे प्रतीक ठरले.
या मतदारसंघात मागील निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार म्हणून ते पराभूत झाले होते. या वेळी काँग्रेसचा बंडखोरीचा तापदायक प्रकार पालकमंत्री राणे यांनी रोखला. काँग्रेसने विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्याविरोधात आघाडी उघडत या ठिकाणी राष्ट्रवादीला धक्का दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gurunath pednekar of congress won the by election in insuli district
Show comments