सांगली : पोलीसांनी सापळा लावल्याचा अंदाज येताच ३० लाखाच्या गुटख्यासह आयशर टेम्पो बेवारस सोडून तस्करांनी पलायन केल्याची घटना पुणे-बंगळूर महामार्गावर इस्लामपूरजवळ पेठ येथे घडली. पोलीसांनी टेम्पोसह गुटखा, सुगंधी तंबाखू व दोन भ्रमणध्वनी घटनास्थळाहून जप्त केले.
महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा व सुगंधीत तंबाखू यांची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीस पथकाने पेठ नाक्यावर सापळा लावला. यावेळी आयशर टेम्पो (केए २९ ए ५०८७) बेवारस अवस्थेत आढळला. तपासणी केली असता प्लास्टिक पोत्यात भरलेला गुटखा व सुगंधी तंबाखू आढळला. याचे मूल्य ३० लाख २४ हजार रुपये असून वाहनात दोन भ्रमणध्वनीही मिळाले आहेत. पोलीसांनी दहा लाखाच्या टेम्पोसह दोन भ्रमणध्वनी, गुटखा, सुगंधी तंबाखू असा सुमारे ४० लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.