इगतपुरी शहरातील नंदलाल मुरलीधर चांडक किराणा स्टोअर्सवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुटखा, सुगंधित तंबाखू याच्या जवळपास ४० हजार पुडय़ा हस्तगत केल्या. या मालाची किंमत ६० हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी नंदलाल चांडक यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा मानके कायद्यांतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू यावर बंदी असताना त्याची सर्रासपणे विक्री होत असल्याची तक्रार केली जाते. पानटपऱ्यांवर छुप्यामार्गाने या वस्तू विकल्या जातात. बंदीमुळे परराज्यातून गुटखा आणून तो जादा किमतीला विकण्याचा व्यवसाय सध्या जोमात सुरू आहे. त्याची अनुभूती खुद्द अन्न व औषध प्रशासन विभागही छापा टाकताना घेते. या विभागाच्या भरारी पथकाने इगतपुरीच्या भाजी मार्केट परिसरातील नंदलाल चांडक किराणा दुकानावर काही दिवसांपासून पाळत ठेवली होती. या दुकानात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू यांची साठवणूक व विक्री केली जात असल्याचे निष्पन्न झाले. भरारी पथकाने मंगळवारी दुपारी अचानक दुकानावर छापा टाकला. तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू यांच्या ३९ हजारहून अधिक पुडय़ा सापडल्या. हा सर्व साठा जप्त करून पोलिसाच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी दुकानाचे मालक नंदलाल चांडक यांच्याविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार आणि साहाय्यक आयुक्त (अन्न) ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा