छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या देशाच्या इतिहासात खूप मोठं योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं? इतिहास कधीही किंतू परंतू मानत नसतो. घडलेल्या घटनांच्या आधारावर इतिहास लिहिला जातो. मात्र या प्रश्नाच्या उत्तरावर कल्पना केली जाऊ शकते. मी कल्पना केली तर अनेक लोक अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देतील. पण मला आज यशवंतराव चव्हाण यांचं वाक्य आठवतं आहे ते म्हणाले होते की छत्रपती शिवराय नसते तर भारताचं काय झालं असतं हे सगळ्या जगाला माहित आहे. पाकिस्तानची सीमा शोधण्यासाठी फार दूर जावं लागलं नसतं कदाचित तुमच्या माझ्या घराच्या बाहेरच ही सीमा असती. मी यावर काही भाष्य करणार नाही. पण शिवाजी महाराजाचं जीवन हे सत्तेच्या लालसेसाठी नव्हतं. त्यांनी होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली. स्वराज्य, निष्ठा आणि स्वधर्म यासाठी त्यांनी संघर्ष केला असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करत आहोत आणि शिवसृष्टीचं लोकार्पण होतं आहे. मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे हे माझं भाग्य आहे असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवरायांना मी कोटी कोटी नमस्कार करतो असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. त्यांनी देशासाठी आणि राज्यासाठी जे योगदान दिलं ते अतुलनीय आहे त्यालाही मी वंदन करतो असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांनी आपलं सगळं आयुष्य छत्रपती शिवराय या एका विषयावर खर्ची घातलं. संपूर्ण देश फिरून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत त्याची माहिती घेतली आणि जनतेलाही त्याची ओळख करून दिली. बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा हा प्रयोग केला होता. त्यावेळी मी गुजरातमध्ये होतो गुजरातमध्ये आम्ही ८ जिल्ह्यात जाणता राजाचे प्रयोग केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय हे नारे कुणीही न सांगता लागत असत. आज बाबासाहेब पुरंदरे हयात नाहीत पण त्यांचं स्वप्न साकार होतं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवसृष्टीचं राहिलेलं कामही लवकरच पूर्ण होईल असाही विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलं. शिवसृष्टीचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते आज पूर्ण होतं आहे.
शिवसृष्टीचा प्रकल्प ४३८ कोटींचा आहे. याचा पहिला टप्पा सुरू होतो आहे. चार टप्पेही दिलेल्या वेळात पूर्ण होतील याचा मला विश्वास आहे. पहिल्या टप्प्यात शिवकालीन इतिहासातले अनेक प्रसंग आहेत. आग्र्याहून सुटका, शिव राज्याभिषेक यासारखे अनेक प्रसंग या ठिकाणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं सगळं लिखाण वाचणं शक्य नाही. पण इथे जी व्यक्ती येईल त्या व्यक्तीला शिवाजी महाराज कळतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास त्यांचे विचार हे लोकांना समजणं खूप आवश्यक आहे. तेच काम या माध्यमातून होईल असा मला विश्वास वाटतो आहे.
थ्रीडी आणि फोरडी तंत्रज्ञान वापरून आणि इतिहास जिवंत करण्याचा उत्तम प्रयत्न या ठिकाणी झाला आहे. जगभरातल्या इतिहासप्रेमींसाठी, शिवप्रेमींसाठी हे ठिकाण महत्त्वाचं असणार आहे. फक्त विचार करून बघा छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं? जर तर चालत नसतं. पण यशवंतराव चव्हाण यांचं एक वाक्य सांगतो ते म्हणाले होते की “छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमारेषा शोधण्यासाठी लांब जावं लागलं नसतं आपल्या घराबाहेरच ती सीमा सापडली असती” मला हे वाक्य सांगायचं कारण काहीही नाही पण मला छत्रपती शिवरायांचं महत्त्व काय आहे ते सांगण्यासाठी मी हे वाक्य सांगितलं असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
अफजल खानाचा वध असेल किंवा शाहिस्तेखानाला पुण्यातल्या लाल महालातून पळवून लावणं असेल सगळे प्रसंग पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या मोहिमांमध्ये पुढाकार घेतला होता. राजा कसा असावा, शासक कसा असावा याचं उदाहरण छत्रपती शिवरायांनी आपल्यासमोर ठेवलं आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.