राहाता परिसरास वादळी वा-यासह गारपीट व पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी झाडे पडली तर अनेकांच्या घराची छतेही उडाली. अकोले शहरासह तालुक्यातही वादळी पाऊस झाला. राहत्यात सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळी वा-यासह गारांच्या वर्षावात पावसाचे आगमन झाले. सोसाटय़ाच्या वा-यासह बोरांच्या आकाराच्या गारांच्या वर्षावाने राहाता शहरासह साकुरी, दहेगांव, केलवड, कोऱ्हाळे आदी भागात गारांच्या वर्षावाने जमिनीवर शुभ्र शालू पांघरल्याचे मनमोहक दृश्य राहाता तालुक्यातील जनतेला अनुभवायला मिळाले. अवघ्या दहा मिनिटांत संपूर्ण रस्ते गारांच्या प्रचंड वर्षांवामुळे सुन्न झाले होते. टपो-या गारांमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. गारपिटीबरोबरच मोठय़ा प्रमाणात वादळी वारे सुरू होते या वादळाने अनेकांच्या घरांची व जनावरांची छपरेही उडाली. काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. दहेगाव व साकुरी परिसरात विद्युत रोहित्रांसह अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला. तर राहाता शिर्डी दरम्यान लावण्यात आलेले मोठे  फलकही या वादळामुळे कोलमडले. अकोले शहरासह तालुक्याच्या पूर्वभागात आज अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या या पावसाने शेतीला काहीसा दिलासा मिळाला असला तरी वादळाने अनेक ठिकाणी वाताहत केली. झाडे उन्मळून पडली व विजेचे खांब कोसळले. घरावरील तसेच कांद्याच्या चाळीवरील पत्रे, कौले उडून गेली. रस्त्यावर झाडे पडल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीत व्यत्यय आला. दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक ढगांनी गर्दी केली. गडद अंधारून आले, सोसाटय़ाच्या वा-याने बराच काळपर्यंत धुळीचे लोट वातावरणात पसरलेले दिसून येत होते. आढळा परिसरातील वीरगाव, डोंगरगाव, गणोरे, हिवरगाव आदी परिसरात वादळापाठोपाठ तुफ़ानी पर्जन्यवृष्टी झाली. शेताचे बांध पाण्याने तुडुंब भरले. मात्र संपूर्ण आढळा खोरे अंधारात बुडून गेले आहे. कांद्याच्या चाळीवरील छप्पर उडून कांदा भिजला. वीरगाव फ़ाटय़ाजवळ वीज कोसळून एका शेतक-याचे दोन बैल जागीच गतप्राण झाले. झाड आडवे पडल्यामुळे अकोले – देवठाण वाहतूक विस्कळीत झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा