परभणी : उन्हाळ्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून काल सोमवारी तापमानाने चाळिशीचा पारा गाठला. आज मंगळवारी (दि.१)दिवसभर आकाश ढगाळ राहिल्याने वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. दरम्यान पुढील तीन दिवसात मराठवाड्याच्या काही भागात कुठे गारपीट तर कुठे हलक्या सरी कोसळतील असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान उद्या बुधवारी (दि.2) छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर राहून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर तूरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.  बुधवारीच (दि.2) परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट असे हवामान राहणार आहे. वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

तर गुरुवारी (दि.3) परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हयात आणि शुक्रवारी (दि.4) लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक ताशी 30 ते 40 किलोमीटर राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसने  वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे. तापमान हळूहळू चढत्या भाजणीने वाढत चालले असून या उन्हाळ्यात तापमानाने काल चाळीशीचा पारा गाठला. दरवर्षी एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यात परभणीचे तापमान सातत्याने गेल्या काही वर्षांपासून वाढत चालले आहे. एप्रिल महिन्यातील काही दिवसात तर मे महिन्याच्या पूर्वार्धात तापमानाचा पारा ४६ अंशापर्यंत जाऊन पोहोचतो असा परभणीकरांचा अनुभव आहे.

आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने तापमान कमी होते मात्र हवेत उकाडा प्रचंड प्रमाणात जाणवत होता.सध्या आंब्याच्या झाडाला मोठ्या प्रमाणात कैऱ्या लगडलेल्या आहेत. अशा परिस्थितीत जर अवकाळी पाऊस पडला तर त्याचा फटका आंब्याच्या झाडांना बसण्याची शक्यता आहे.