पपयांनी लगडलेली तब्बल पाच एकरांतील बाग म्हणजे भविष्यातील पुंजी. १५ रुपये किलो याप्रमाणे बाग व्यापाऱ्याला तोडणीसाठी दिलीही. पहिल्या तोडणीतच पाच लाख हातात येतील.
सगळी तोडणी झाली, की वीसेक लाखांपर्यंत रोकड सहज मिळेल.. एवढा पैसा एकरकमी हाती आला, की किमान एक-दोन वर्षे तरी चिंता नाही..
भाऊराव विठ्ठल पाटील यांनी रंगविलेले हे संसाराचे चित्र निसर्गाला मात्र मान्य नव्हते. २४ फेब्रुवारीला पाऊस, वादळवारा आणि गारपिटीने थैमान घातले आणि या चित्रातील सारे रंगच पुसले गेले. आता भविष्याचा काळाकुट्ट रंग त्यांच्याभोवती फेर धरून नाचत आहे..
अमळनेर तालुक्यातील चोपडाई-कोंढावळ या गावासाठी तो दिवस वेदनादायी ठरला.  वादळी पाऊस आणि गारपिटीने होत्याचं नव्हतं केलं. अनेक संसार अक्षरश: उघडय़ावर आले.. विझलेल्या स्वप्नांच्या भयाण आठवणींचे डोळ्यांवरून उतरून सुकून गेलेले अश्रू पुसायचंदेखील भान आज अनेकांना उरलेलं नाही. सारं विषण्ण, सुन्न!.. भाऊराव पाटील हे त्यापैकीच एक.  निसर्गाच्या या वावटळीत पाटील कुटुंबीयांच्या स्वप्नांचाही पालापाचोळा झाला. पाच एकर शेतीत चार लाख रुपये खर्च करून केलेल्या पपईच्या बागेला चांगला बहर आला होता. काळ्या आईच्या कृपेने हाती येणारा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी गुंतविण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. पहिल्या तोडणीचेच पाच लाख रुपये हातात येणार होते.
२५ फेब्रुवारीला व्यापाऱ्याची माणसे मालतोडणीस येणार होती आणि नेमक्या आदल्या दिवशी निसर्गाचा कोप झाला. वादळ, पाऊस आणि गारपीट या तिघांनी जणू एकत्र येऊन परिसरावर हल्ला केला. बहरात आलेले पीक आणि त्याचबरोबर पाटील यांच्या आशाआकांक्षा मातीस मिळाल्या.
..पोटच्या पोराप्रमाणे दिवसरात्र कष्ट करून वाढवलेली पपईची बाग एका क्षणात उद्ध्वस्त झालेली पाहून कुटुंबातील सर्वच जण गप्पगार झाले आहेत. जी पपई लाखो रुपये मिळवून देणार होती, ती मातीमोल दराने व्यापाऱ्याला द्यावी लागली, असे हताश उद्गार १० जणांच्या कुटुंबाच्या या पोशिंद्याने काढले, तेव्हा भिंतीआडून उमटलेला एक हुंदकाही आसपास घुमला आणि सगळं घरच शहारून गेलं.. भाऊराव पाटील यांची दोन मुलं महाविद्यालयीन शिक्षण घेतायत. त्यांनी खूप शिकावं, त्यासाठी कितीही कष्ट उचलायची आपली तयारी आहे, असं ते म्हणायचे.. पण आता त्यांच्या या अपेक्षांनाच तडा गेला आहे.
‘‘कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे झाले खरे, पण अद्याप एक पै मिळालेली नाही. तुम्हाला कृषी विभागातर्फे एक हेक्टरचे अनुदान देण्यात येईल, असे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपणास सांगितलंय, पण प्रत्यक्ष मदत अद्याप मिळालेलीच नाही. केंद्रीय पथक येणार म्हणून शेत शिवारातील शेतकरी जमा झाले, परंतु समितीचे सदस्य इकडे फिरकलेच नाहीत.  निसर्ग कोपलाय आणि शासन लक्ष देत नाही.. काय करणार?’’ असे भाऊराव पाटील म्हणाले.