जगलो आहे, जगतो आहे, वाकुलतीने बघतो आहे, वारा खात, गारा खात. ४० एकर ओलिताखालची जमीन. उभं पीक होत्याचं नव्हतं झालं. पोरीचं लग्न कशानं करावं, ही समस्या उभी आहे. घरावरचं छप्पर उडून गेलं. टरबुजाचं रान गारठलं. मदत कधी येईल, काय माहीत? कंधार तालुक्यातील घोडज येथील केशव रघुनाथ लाडेकर या शेतकऱ्याची व्यथा मन हेलावून टाकणारी आहे.
घोडज भागात गारपिटीने शेतीची मोठी हानी झाली. माळरानावर जणू बर्फाची चादर अंथरली, असे दृश्य होते. केशव, उद्धव, रघुनाथ, माधव लाडेकर हे भाऊ. एकत्रित कुटुंब. घरात ३० माणसांचं खटलं. सर्वजण शेतातच काम करतात. ४० एकर वावर. सकाळपासनं अंधार होईपर्यंत शेतात राबावं आणि गारपिटीत मोडून पडावं, अशी अवस्था. केशव लाडेकर म्हणाले की, आम्ही सगळे भाऊ, आमची मुले, घरातील बाया शेतात काम करतो. गारपिटीत आमचा पाच हेक्टरमधील ४० क्विंटल कापूस अंदाजे २ लाख रुपयांचा झाला असता. आता शेतात पऱ्हाडय़ा उभ्या आहेत. चार हेक्टरात गहू होता. कापणीला आला होता. ८० पोती भरली असती, पण सगळं गेलं. हरभरा, कांदा, लसूण गेला. आंब्याची झाडं मोहोरली होती. कलमी आंबे होते, पण झाडं मोडून पडली. उरलेली झाडं झडून गेली. चंदन-सागाची झाडे तुटली. या गारपिटीत सात-आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. यंदा घर बांधायचा विचार होता. माझ्या मुलीचं लग्न जमलंय. शेवटचं लग्न आहे. खर्च खूप आहे, पण निसर्गाची अवकृपा झाली. आम्ही हतबल झालो. हे सांगताना त्यांचा कंठ भरून आला, पण निसर्गाच्या पुढे कोणाचंच चालेना, असं म्हणत त्यांनी सावरले व नव्या जोमाने कामाला लागले. नुकसानभरपाई शासन किती देईल, असे आम्हाला विचारत होते.
याच गावातील सुभाष व विश्वनाथ देविदास लाडेकर या दोन्ही भावांच्या शेतीचे खूप नुकसान झाले. गावात घर नाही म्हणून शेतात राहतात. शुगरक्वीन नावाचे दोन हजार रुपये तोळाप्रमाणे टरबूजचे बियाणे खरेदी केले. ४० हजारांचे बी आणून एक हेक्टरमध्ये ठिबकद्वारे टरबुजाची लागवड केली, पण गारपिटीत टरबूज उद्ध्वस्त झालं. पाच ते सहा किलोंचे फळ झाले असते. चार-पाच लाख रुपयांचे टरबुजाचे, तीन एकरातील गव्हाचे, दोन एकरातल्या हरभऱ्याचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांची सात-आठ लाख रुपयांची हानी झाली. यंदा पैसे आल्यानंतर गावात घर बांधायचा निर्णय झाला होता. त्यांच्याकडे एक खंडी म्हणजे २० जनावरे. त्यात बैल, गायी-म्हशी आहेत. गारपिटीमुळे चाऱ्याची समस्या निर्माण झाली, असे सुभाष लाडेकर यांनी सांगितले.
या भागात गारपीट मोठी झाली. झाडांची पाने झडली. चारा नाही, पंचनामे झाले. पण मदत कधी येईल याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्टय़ा खचला, परंतु हिमतीने तो उभा राहून पुन्हा कामाला लागला आहे.
हतबलतेची व्यथा!
जगलो आहे, जगतो आहे, वाकुलतीने बघतो आहे, वारा खात, गारा खात. ४० एकर ओलिताखालची जमीन. उभं पीक होत्याचं नव्हतं झालं.
First published on: 17-03-2014 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hailstorm farmers serenders to fate