बदनापूर तालुक्यातील तळणी-लोधेवाडी गावात ३३४ शेतकऱ्यांचे बहुवार्षिक बागायती फळपिकांचे गारपिटीने नुकसान झाल्याचे खोटे दाखवून १ कोटी ४ लाख ७५ हजार रुपयांची शासकीय मदत तहसील कार्यालयामार्फत जिल्हा बँकेत वर्ग करण्यात आली. जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे या बाबत तक्रार करण्यात आली.
सुभाष कोळकर यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, ग्रामसेवक, तसेच तलाठी व कृषी सहायक यांना बदनापूर तालुक्यातील ९२ गावांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु बदनापूर तालुक्यातील भाजपचे जि. प. सदस्य भगवान तोडावत व भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संगनमत करून निवडणुकीत फायदा व्हावा, या साठी खोटे पंचनामे करावयास लावले. त्यामुळे शासकीय मदतीचा दुरुपयोग झाला.
बदनापूर तालुक्यातील तळणी-लोधेवाडी गावात ३३४ शेतकऱ्यांच्या बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले. या गावात पाहणी केली असता कोठेही फळपिकांचा मागमूसही दिसला नाही. यंत्रणेने पाहणी केल्यास तेथील फळपिकांचे पंचनामे १०० टक्के खोटे असल्याचे सिद्ध होईल. तसेच मतदार असलेल्या काही शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदतीच्या मर्यादेपेक्षा अधिक रक्कम देण्यात आली. निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला असल्याने दोषी असणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी कोळकर यांनी केली.
राष्ट्रीय संत संदेश पार्टीचे उमेदवार रामभाऊ उगले यांनीही अशीच तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांकडे करून कारवाईची मागणी केली.