पश्चिम विदर्भात सुरू असलेल्या अकाली पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे दीड लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून अजूनही पावसाचा कहर सुरूच आहे. सर्वाधिक ४२ हजार १८१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान अमरावती जिल्ह्य़ात झाले आहे. या पावसाने विदर्भातील विविध जिल्ह्य़ात गहू, चना, कापूस, सोयाबीन आणि मृगबहराच्या संत्रा पिकाचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अमरावती विभागात गेल्या काही दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने गहू, हरभरा, तूर पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान केले. संत्री बागांनाही जबर तडाखा बसला. २२ फेब्रुवारीपासून सर्वदूर अकाली पावसाचा जोर होता. गेल्या २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसादरम्यान वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. पन्नासावर जनावरे दगावली आहेत. एकटय़ा वाशीम जिल्ह्य़ातच ३७ जनावरांचा मृत्यू झाला व घरांचीही पडझड झाल्याची प्रशासनाची माहिती आहे.  
जानेवारीतील वादळी पावसामुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालेले असताना अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या हाती मदत पोहोचलेली नसतानाच आता नव्याने झालेल्या नुकसानीची भरपाई केव्हा मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, नागपूर विभागात गेल्या दहा दिवसातील अवकाळी पावसामुळे शेतक ऱ्यांना मोठा फटका बसला. रविवारी विविध जिल्ह्य़ात झालेल्या पावसामुळे शेतक ऱ्यांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी काही जिल्ह्य़ात अचानक या पावसाने कापूस व गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले असून उत्पादनात अध्र्यापेक्षा जास्त घट होण्याची भीती शेतक ऱ्यांनी व्यक्त केली आहे. हरभरा पिकाचे पाऊस व गारपिटीने फूल गळल्याने क्षार नष्ट झाले असून तूर पिकाची कापणी शेतक ऱ्यांनी करून ठेवली होती ती पावसात ओली झाली, तसेच कापूससुद्धा ओला झाला आहे. नरखेड तालुक्यात कृषी भूमी ७५ टक्के असिंचित असल्याने हरभरा पेरणीचे क्षेत्र जास्त आहे. याच पिकावर शेतकऱ्यांची भिस्त असते, पण गारपिटीने संत्र्याला मार लागल्याने संत्रा गळण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खैरगाव, गुमगाव, थुगावदेव, मदना, पेढमुक्तापूर आदी गावात गारपीट झाल्यामुळे ५० ते ६० टक्के नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे खरीप हंगामातसुद्धा शेतक ऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. सोयबीनचे उत्पादन प्रती एकर १ ते ३ पोतेच झाले. काही शेतक ऱ्यांनी सोयाबीन गोळा केलाच नाही, तर जमिनीतील ओलावा पाहून हरभऱ्याची लागवड केली; परंतु अकाली पाऊस व गारपीट यामुळे शेतक ऱ्यांच्या पदरी निराशाच आली. गव्हाचे उत्पादनही ५० टक्के कमी होण्याची शक्यता आहे.

एक लाख शेतकऱ्यांच्या शेती व फळबागांमध्ये तांडव
महसूल आणि कृषी विभागाच्या सर्वेक्षणानंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार अमरावती जिल्ह्य़ात ४२ हजार १८१ हेक्टर, बुलढाणा ४१ हजार ७९४, यवतमाळ १७ हजार ७२८, अकोला १४ हजार ५३३ आणि वाशीम जिल्ह्य़ात १ हजार २०४ हेक्टरात पीकहानी झाली आहे. अजूनही सर्वेक्षण सुरूच आहे. फळबागांचे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे.संत्री आणि मोसंबीच्या बागांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार ९ हजार ५१८ हेक्टरमधील फळबागा आणि ६ हजार ४७७ हेक्टरवरील भाजीपाला नष्ट झाला. एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना याचा तडाखा सहन करावा लागला आहे.