लातूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नगर : मराठवाडय़ातील लातूर, बीड आणि धाराशिवसह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, नगर जिल्ह्याच्या अनेक भागाला शनिवारी गारपीटीसह अवकाळीने झोडपून काढले. या आपत्तीने गहू, ज्वारी पिकांसह द्राक्ष, डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. लातूरच्या चाकुर तालुक्यातील तीर्थवाडी येथे वीज पडून मृत्यू एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
मराठवाडय़ाला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर, चाकूर,तर धाराशिव जिल्ह्यातील येडशी, येरमाळा, उमरगा तालुक्यात गारपीट झाली. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तलमोड, जगदाळवाडी, धाकटीवाडी, हिप्परगा, तुरोरी, कराळी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. धाराशीव तालुक्यातील येडशी, आळणी परिसरातही गारपीट झाल्याचे वृत्त आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोयगाव तालुक्यात तसेच अजिंठा परिसरातही अवकाळी पाऊस झाला. दररोज नवनव्या गावांमध्ये पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे. काढणीला आलेला हरभरा व गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तलमोड, जगदाळवाडी, धाकटीवाडी, हिप्परगा, तुरोरी, कराळी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. धाराशीव तालुक्यातील येडशी, आळणी परिसरातही गारपीट झाल्याचे वृत्त आहे. चाकुर तालुक्यातील तीर्थवाडी येथे गावात नागभूषण विश्वनाथ पाटील ( ५० वर्षे) यांचा शुक्रवारी रात्री वीज पडून मृत्यू झाला.
या गारपिटीने काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला याचे मोठे नुकसान झाले. आंब्याला लागलेला मोहर झडून गेला तर वादळी वाऱ्यामुळे चिंचाही गळून पडल्या. अचानकपणे झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी भांबावून गेला होता. गारांची जाडी मोठी असल्यामुळे अनेकांना त्याचा मारा सहन करावा लागला. दरवर्षीच निसर्गाचा फटका सहन करावा लागत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. लातूर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत एक हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी ‘ लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. लातूर जिल्ह्यातील ५४ पैकी ३० मंडळात गारांचा पाऊस व गारपीट झाल्याचे समजल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेऊन नुकसानी बाबतची प्राथमिक माहिती घेतली.
सोलापूर जिल्ह्यातही गारपीट
सोलापूर जिल्ह्यातही अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस आदी तालुक्यांमध्ये काही गावांत शनिवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या काही पिकांची हानी झाली आहे. अक्कलकोट तालुक्यात किणी गावच्या शिवारात रात्री गारपीट होऊन त्यात काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले. माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी, कण्हेर, रेडे, इस्लामपूर, माणकी आदी गावांमध्ये अवकाळी पावसापाठोपाठ गारपीट झाली. यात गहू, ज्वारीसह काढणीला आलेल्या काही पिकांची हानी झाली. करमाळा तालुक्यातही जेऊर शेलगाव, कडेगाव, वाशिंबे, चिखलठाण, पारेवाडी, शेटफळ या गावांच्या परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी, पेरू या नगदी पिकांसह गहू, ज्वारी पिकांचे नुकसान झाले.
पंढरपूरमध्ये द्राक्ष, डाळींबाचे नुकसान
पंढरपूर : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. त्यामुळे द्राक्ष, डाळींब, गहू आदी पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षभरात पावसाने तडाखा दिल्याने बाजीराजा चिंतातूर आहेत. तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्याबी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यातील कासेगाव, मौन्धेवाडी, गोपाळपूर आदी ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे. शेतशिवार आणि रस्त्यावर काही वेळ गारांचा सडा दिसून आला. नगर जिल्ह्याच्याही काही भागात शनिवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली.संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक महामार्गावरील साकुर फाटा परिसरात आज दुपारी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. या वेळी रस्त्यावर गारांचा असा खच पडला होता.