मराठवाडा, श्रीरामपूर, कोपरगाव, पुणे जिल्ह्य़ात शिरूर येथे आज गारपीटीने तडाखा दिला. सर्वाधिक फटका मराठवाडयात बसला असून त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.परळीत  वीज पडून व झाड कोसळून  दोन जणांचा मृत्यू झाला.  निवडणुका असल्या तरी मुख्यमंत्र्यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल पाठवून द्यावा आपण शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करू असे कृषी मंत्री शरद पवार यांनी शनिवारी पंढरपूर येथे सांगितले.मराठवाडय़ात गेल्या आठवडय़ापासून सुरू असलेल्या वादळी पाऊस व गारपिटीने शनिवारी अधिक रौद्र रूप धारण केले. परळीत वीज पडून एकाचा, तर झाड कोसळून ऊसतोड मजूर महिलेचा मृत्यू झाला. या शिवाय तालुक्यात २२जण जखमी झाले. गारांच्या माऱ्यात जनावरेही मोठय़ा प्रमाणात जखमी झाली. सायंकाळी उशिरापर्यंत सर्वत्र गारांचे थर दिसत होते.
पुणे जिल्ह्य़ातील शिरूर गावात दुपारच्या सुमारास सर्व परिसराला गारांसह पावसाने झोडपून काढले, तेथे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
नगर जिल्ह्य़ात अन्यत्र सुरू असलेला गारपीटीचा फेरा शनिवारी श्रीरामपूर तालुक्यातही आला. भर दुपारी श्रीरामपर तालुक्यात झालेल्या गारपीटीत तालुक्याच्या काही भागातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. संत्र्याच्या आकाराच्या गारांची चादर अंथरली गेली. हाता तोंडाशी आलेली पिके पूर्णपणे नामशेष झाली. गारांच्या माराने पाच मोर दगावले.
श्रीरामपूर, गोंधवणी, शिरसगाव, माळवाडगाव, कमालपूर, घुमनदेव, मुठेवाडगाव, ब्राम्हणगाव ममदापूर, भोकर, खंडाळा या गावांना गारपीटीचा मोठा तडाखा बसला. दुपारी दोन वाजता गारा पडू लागल्या. अर्धा तास गारांचा वर्षांव होत होता. यात गाडय़ांच्या काचा फुटल्या, जनावरे जखमी झाली, सोलर पॅनल फुटले, गह, कांदा, हरभरा भईसपाट झाले.
कोपरगाव परिसरात शनिवारी दुपारी सव्वादोन ते पावणेतीनच्या दरम्यान झालेल्या गारांच्या पावसाने तालुक्याच्या पूर्व भागात शेतीचे अतोनात नुकसान केले. साधारण एक ते अडीच इंच इतका गारांचा खच जमिनीवर पडला होता.
तालुक्यातील उक्कडगाव, कासली, शिरसगाव, बोधेगाव, बोकटे, सावळगाव, रामवाडी, कान्हेगाव, सडे, दहेगाव, बिरोबा चौक या भागात दुपारी गारांचा हा पाऊस झाला. या पावसामुळे गहू, कांदा, हरभरा, कापूस, ऊस, चिक्कू, डाळिंब, मका ही पिके या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने भुईसपाट झाली. शेतकऱ्यांचे या पावसाने अतोनात नुकसान झाले असून उभी पिके होत्याची नव्हती झाली. गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात आम्ही गारांचा असा पाऊस अनुभवला नव्हता असे शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकरी पुरता हतबल
मराठवाडय़ाला पुन्हा गारपिटीचा तडाखा
मराठवाडय़ात शनिवारीही अवकाळी पाऊस व गारपिटीचा दणका सुरू होता. सततची गारपीट पाठ सोडायला तयार नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. दुसरीकडे नुकसानीची पाहणी करून परतणाऱ्या पथकालाही पुन्हा होणाऱ्या गारपीटीची पाहणी करावी लागत असल्याने प्रशासनाच्या पातळीवरही मोठी कसरत सुरू आहे. शनिवारी दुपारनंतर औरंगाबाद जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात गारपीट झाली. हिंगोली, बीड जिल्ह्य़ांनाही गारपिटीचा तडाखा बसला, लातूरच्या अहमदपूर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील सिल्लोड, कन्नड, पैठण, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद आदी तालुक्यांत बहुतेक ठिकाणी शनिवारी गारपीट झाली. जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सिल्लोड, कन्नड भागात गारपिटीने जालेल्या नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्य़ात शंभरावर गावांना नुकसानीचे पंचनामे करण्यास पथके पाठविल्याचे त्यांनी सांगितले. सिल्लोड तालुक्यात ४ मुले किरकोळ जखमी झाली.
लातूर, अहमदपुरास झोडपले
लातूर – शनिवारी संध्याकाळनंतर लातूर व अहमदपूर परिसरास पावसाने पुन्हा झोडपले. गेल्या १५ दिवसांपासून लातूरकर अवकाळी पावसाने त्रस्त झाले आहेत. आतापर्यंत ५ वेळा जिल्हय़ाच्या विविध भागात गारपीट झाली आहे. शनिवारी सकाळी सूर्यदर्शन झाले. आकाश निरभ्र राहिल्यामुळे आता पावसापासून सुटका मिळेल, असा अंदाज शेतकरी बांधत असतानाच तो चुकीचा ठरवत पावसाने पुन्हा दगा दिला. लातूर शहर परिसर, तसेच अहमदपूर तालुक्यातील खंडाळी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. शनिवारी कुठे गारपीट मात्र झाली नाही. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी शनिवारी जिल्हय़ात कुठेच गारपीट झाली नसल्याचे सांगितले.
बीडमध्येही गारपीट
बीड – शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बीडसह जिल्ह्य़ात सर्वत्र गारपिटीने पुन्हा झोडपून काढले. मागील सलग ५ दिवसांपासून जिल्हयात मोठय़ा प्रमाणात वेगवेगळया भागात गारपीट होत असून नसíगक आपत्तीने सर्वसामान्य शेतकरी बेजार झाला आहे. गारपिटीने रब्बी पिके पूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत. वादळ, वाऱ्यासह गारपीट तब्बल अर्धातास सुरू होती. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा गारपिटीमुळे फुटल्या, तर रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात गारांचे ढीग साठले.
नांदेडात थमान
नांदेड – निसर्गाची अवकृपा थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून जिल्ह्याच्या अनेक भागात शनिवारी पाऊस झाल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला. अवकाळी पाऊस, गारपिटीचे थमान सुरूच आहे. गुरुवारच्या तडाख्यानंतर पावसाची अवकृपा थांबेल, असे वाटत होते. परंतु शुक्रवारी व शनिवारी अनेक भागात बेमोसमी पावसाची नोंद झाली. गुरुवारच्या गारपीटीनंतर पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी धिरजकुमार यांनी स्वतंत्रपणे नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश पूर्वीच दिले आहेत. मात्र, सततच्या पावसाने सर्वेक्षणात अडथळे येत असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी पहाटेही पावसाने हजेरी लावली. त्यानंतर काही काळ सूर्यदर्शन घडले. दुपारनंतर नांदेड शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली.
िहगोलीत पिकांची वाट
िहगोली – जिल्ह्यात सहा दिवसांपासून दोन वेळा गारपीट झाली. सततच्या पावसाने रब्बी पिकांची वाट लागली असून, शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले, आता अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी पीक हातातून गेले. त्यामुळे कोलमडून पडलेल्या शेतकऱ्यांचे सगळे लक्ष राज्य सरकारच्या मदतीकडे लागले आहे. सेनगाव व हिंगोली तालुक्यांतील गोरेगाव, कडती, माझोड, साबरखेडा, सुरतखेडा, शिरसम, डिग्रसवाणी, लोहरा, िलभी, जुमडा, मळई, पेडगाव, धोत्रा आदी गावांना शनिवारी गारपिटीने झोडपून काढले. जिल्हा प्रशासनाने दोन दिवसापूर्वी पीकनुकसानीचा अहवाल पाठविला असला, तरी त्यानंतरही सतत सुरू असणाऱ्या अवकाळी पावसाने उर्वरित रब्बी पिकांची वाट लागली. गहू, हरभरा, ज्वारी ही हातातोंडाशी आलेली पिके मातीत मिसळली असल्याने शेतकरी पुरता हैराण झाला.
आणखी तीन दिवस..
परभणी – अवकाळी पावसाने शनिवारीही जिल्ह्य़ात हाहाकार उडवला. जिल्ह्याच्या सर्वदूर भागात तासभर जोरदार पावसाने झोडपले. पाथरी, पूर्णा तालुक्यांत गारांचा मारा झाला. दिवसभर आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाल्याने उन्हाळा की पावसाळा, हेच कळत नव्हते. दरम्यान, मंगळवार (दि. ११) पर्यंत वातावरण असेच पावसाळी राहील, असा अंदाज व्यक्त करतानाच काही भागात गारपीटही होण्याची शक्यता मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली. फेबुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात सुरू झालेले अवकाळी पावसाचे थमान मार्चच्या पहिल्या आठवडय़ातही सुरू आहे. सलग दोन आठवडे गारपीट व अवकाळी पावसाने रब्बी हंगाम बऱ्यापैकी नष्ट केल्यानंतर शनिवारी गारपीट व अवकाळी पावसाने या आठवडय़ाचा शेवट केला. शुक्रवारी मध्यरात्री परभणी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. शनिवारी सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केली होती. दुपारी तीननंतर वातावरण अचानक बदलले. जोरदार वारा वाहू लागला व काही क्षणात पावसाच्या सरी कोसळू लागल्या.
दरम्यान, पश्चिमीवात (ईस्ट्रलीझ) प्रकारचे वारे लक्षद्वीप व दक्षिण गुजरात प्रदेशावर निर्माण झाले असून, मालदीप बेटे व लक्षद्वीप समूह यावर भूपृष्ठापासून सुमारे ९०० मीटर उंचीवर हवामान द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. भूपृष्ठापासुन दीड ते दोन किलोमीटर उंचीवर अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या समुद्रतटीय प्रदेशावर अशीच हवामान द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती येत्या दोन दिवसात अशीच राहण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून ११ मार्चपर्यंत मराठवाडयातील सर्व जिल्हयांत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विशेषत जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयांत तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यता ग्रामिण कृषी हवामान विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक प्रा. प्रल्हाद जायभाये यांनी वर्तवली. कृषी हवामान विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ बी. व्ही. आसेवार यांनी यास दुजोरा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा