गेल्या १५ दिवसांपासूनच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने ३२ जिल्ह्य़ांतील सुमारे १८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला. गहू, हरबरा, ज्वारी, कांदा, भाजीपाला आणि फळबागाही उद्ध्वस्त झाल्या.  ग्रामीण अर्थव्यवस्थेबरोबरच, सामान्य माणसालाही त्याचा फटका बसणार असून आता महिना दोन महिन्यांत भाववाढीचा भडका उडेल.
पिकांच्या नुकसानीचे मोजमाप चालू असताना पुन:पुन्हा गारपीट सुरूच होती. नव्याने पंचनामे करावे लागत होते. सदोष पंचनामे, कुशल मनुष्यबळाचा अभाव व नुकसान कमी दाखविण्याच्या मानसिकतेमुळे आता गारपीटग्रस्त भागात शेतकरी व पंचनामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडत आहेत. बहराला आलेल्या डािळबांच्या फुलावर गारा पडल्याने फुले दुखावली गेली. आता १५ दिवसांत फुले गळून पडतील, पण अधिकारी बागा चांगल्या आहेत असे म्हणतात. त्यांना आज नुकसान दिसणार नाही अन् उद्याच्या नुकसानीचे त्यांच्याकडे आकलन नाही. द्राक्षाचेही तसेच आहे. पंचनामे हे फुलोऱ्याचे व फळांचे केले जातात. वेली व झाडांचे केले जात नाहीत. त्यामुळे फळबागांची लागवड करणारे निराशेने ग्रासले आहेत. नव्या तंत्राने शेती करणाऱ्यांनाही कर्जबाजारी होण्याची भीती वाटत आहे.
विदर्भात सर्वाधिक आत्महत्या
नागपूर : विदर्भात गेल्या तीन आठवडय़ांपासून गारपीट व वादळी पावसाचे थमान सुरूच आहे. गारपीटग्रस्त २८ शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पूर्व विदर्भात सर्वाधिक १२ आत्महत्या झाल्या आहेत. पश्चिम विदर्भात बुलढाणा जिल्ह्य़ात सहा, यवतमाळ जिल्ह्य़ात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
मंत्रिमंडळ बैठकच नाही!
मुंबई : वाढीव आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. मात्र, केंद्र सरकार किती मदत देईल त्यावर भरपाईच्या रकमेबाबत राज्य सरकार निर्णय घेणार आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी होऊ शकली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hailstorm victim farmers future in danger