वाई : सातारा शहरासह तालुका वाई, पाचगणी, भिलार, जावळी, उत्तर कोरेगाव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले. सलग चौथ्या दिवशी साताऱ्यात विजांच्या कडकडाटात गारांचा पाऊस झाला.
रविवारी सकाळपासूनच उन्हाची तगमग आणि वाढत्या तापमानामुळे नकोसे केले असताना आकाशात काळे ढग जमा होऊन जोरदार मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात गारांचा पाऊस झाला. सलग पावसाने शेतकरी वर्गाने धास्ती घेतली आहे आणि शेतातील पिके हातची जाण्याची परिस्थिती झाली आहे.
हेही वाचा – सातारा : अकरा लाख रुपये किंमतीची चांदी चोरीला
सातारा शहरासह जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. सलग चार दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून मोठमोठाल्या गारांचा मारा जिल्ह्यातील नागरिक सहन करत आहेत. उत्तर कोरेगाव तालुक्यात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सलग चार दिवस आहे. आज सातारा शहर, सातारा तालुका, जावळी, भिलार, पाचगणी, वाई, मांढरदेव, पिम्पोडे, वाठार स्टेशन, सोनके, करंजखोप, नायगाव, नांदवळ या गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.
वाई जोर रस्त्यावर वादळी वारे व पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. सायंकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडे हलवल्यावर वाहतूक पूर्ववत झाली. पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावर भोसे येथे मनाम फॅक्टरी शेजारील निलगिरीचे झाड उन्मळून नवीन गाडीवर पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. पाचगणी व भिलार येथे गारांचा खच साठला होता. पावसाचे पाणी पाचगणी बाजारपेठेत घुसले होते. या पावसाने स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान केले आहे. गारांच्या माराने स्ट्रॉबेरी व भाजीपाला पिके खराब होण्याची शक्यता आहे. पावसाळी वातावरण झाल्याने हवेत चांगलाच गारवा आला होता.