पुणे-पिंपरी चिंचवडसह पश्चिम महाराष्ट्राला मंगळवारी दुपारी मेघगर्जनेसह वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्य़ात काही ठिकाणी गारपीटही झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. मात्र, उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मंगळवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत पुण्यात २.८, सातारा येथे सर्वाधिक ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. येत्या चोवीस तासात वादळी पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर तो पुढील वाटचाल करीत बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. मात्र, मान्सूनची पुढील वाटचाल मंदावली असताना पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात स्थानिक वातावरणात झालेल्या बदलामुळे मंगळवारी अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, महाबळेश्वर परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला. हा पाऊस स्थानिक वातावरणात झालेल्या बदलामुळे झाल्याचे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले. सांगली जिल्ह्य़ात दुपारी जोरदार वादळी पाऊस झाला. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्याचबरोबर मिरज, पलूस, कवठेमहांकाळ या ठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. तसेच नाशिक आणि कोल्हापूर परिसरात जोरदार वादळी पाऊस पडला. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे उकाडय़ापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. सायंकाळी साडेपाच पर्यंत कोल्हापूर ४, महाबळेश्वर २, सांगली १९, सातारा ४४ आणि सोलापूर येथे २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पुण्यात वादळी वारे, जोरदार पाऊस
शहरात सकाळी थोडे ढग होते. दुपारनंतर आकाश अचानक भरून आले आणि शहर व पसिरात दीड वाजल्यापासून वादळी वाऱ्यांना आणि जोरदार पावसाला सुरूवात झाली. पिंपरी चिंचवड व परिसरात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. तर, तळेगाव परिसरात काही ठिकाणी गारा पडल्या. दिवसभर आकाश भरून आले होते. दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरात येत्या चोवीस तासात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
नाशिकमध्ये वादळी पाऊस
वादळी वारा अन् विजांच्या कडकडाटासह मंगळवारी दुपारी आलेल्या पावसाने शहरासह जिल्ह्यातील काही भागाला जोरदार तडाखा दिला. यावेळी गारांचाही तुफान मारा झाला. त्र्यंबकेश्वर येथे वीज कोसळून दोन जण ठार झाले. वादळी वाऱ्याने शेकडो झाडे उन्मळून पडली. वीज वाहिन्या तुटल्या. वीज खांबही जमीनदोस्त झाले. यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा विस्कळीत झाला. घोटी-सिन्नर रस्त्यावर लोखंडी कमान कोसळून वाहतूक विस्कळीत झाली. पावसाने आंबे, टोमॅटो व इतर पिकांसह मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान केले.
गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढत असतानाच गारांसह झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. दुपारी दोनच्या सुमारास सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. त्र्यंबकेश्वर येथे गोरक्षमठ परिसरात वीज कोसळून दोन जण जागीच ठार झाले. मठ परिसरात मंदिराचे काम काही मजूर करत होते. यावेळी वीज कोसळून सेवाराम राजपूत (४०, राजस्थान) आणि जगन चंदर शिंदे (४०, सातपूर) यांचा मृत्यू झाला. तर अंजनाबाई शिंदे व धनाराम राजपूत हे जखमी झाले. इगतपुरी तालुक्यात घोटी-सिन्नर रस्त्यावरील लोखंडी कमान जमीनदोस्त झाली. त्यामुळे शिर्डीकडे ये-जा करणाऱ्या वाहतुकीवर काही काळ विपरित परिणाम झाला. वादळाने नाशिक शहर व परिसरात शेकडो झाडे कोसळली. त्याखाली अनेक ठिकाणी मोटारी व अॅटोरिक्षा सापडल्या. अनेक रस्त्यांवरील वाहतूक या पडझडीमुळे ठप्प झाली. घरांवरील पत्रे उडून गेले. लग्नाचे मंडप उध्वस्त झाले.
अनेक वीज वाहिन्या तुटल्या. काही ठिकाणी वीज खांबही वाकले. त्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. वादळी पावसाचा तडाखा सुरू असताना दुसरीकडे गारांचाही मारा सुरू होता. त्यामुळे सर्वत्र गारांचा अक्षरश: सडा पडला होता. मोठय़ा प्रमाणात झाडे कोसळल्याने अग्निशमन विभागाला तारेवरची कसरत करावी लागली. कोसळलेली झाडे बाजुला हटविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू होते. महावितरणची यंत्रणा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी झटत होती. पावसात टोमॅटोच्या बागा, वांगे, कारले व इतर भाजीपाल्याची शेती उध्वस्त झाली. आंब्याचेही मोठे नुकसान झाले.
राज्यभरात ४ बळी
पहिल्याच पावसाने राज्यात चार जणांचे बळी गेले. त्र्यंबकेश्वर येथे गोरक्षमठ परिसरात वीज कोसळून दोन जण जागीच ठार झाले. मठ परिसरात काही मजूर मंदिराचे काम करत होते. यावेळी वीज कोसळून सेवाराम राजपूत (४०, राजस्थान) आणि जगन चंदर शिंदे (४०, सातपूर) यांचा मृत्यू झाला, तर अंजनाबाई शिंदे व धनाराम राजपूत हे जखमी झाले. खंडाळा तालुक्यातील धावडवाड येथे मंगळवारी दुपारी शेतात काम करणाऱ्या दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. द्वारकाबाई तुकाराम बिचुकले (वय ५५, रा. अहिरे) व निखिल चंद्रकांत शिंदे (वय, २२, रा. हरळी) ही मृतांची नावे आहेत. हे दोघेही टोमॅटोच्या शेतात काम करीत होते. दुसऱ्या एका घटनेत पाटखळमाथा येथे झाडावर वीज पडून नऊ शेळ्या, तसेच एक गाय जागीच ठार झाली.