जिंतूर-औरंगाबाद महामार्गावर नाकाबंदी करत असताना मोटारमधून अर्धा किलो सोन्याचे बिस्कीट, ८ किलो चांदी, तर खासगी आराम बसमधून ४३ लाख रुपयांचे सिगारेट व शहरातील एका लॉजमधून तीन लाख रुपयांची गर्भपाताची औषधे जिंतूर पोलिसांनी शनिवारच्या रात्री जप्त केली. तसेच नाका तपासणीच्या वेळी ९ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली. रात्री ८ ते १० या दरम्यान जिंतूर पोलिसांनी ही कामगिरी केली.
लोकसभा निवडणुकीनिमित्त जिल्हाभरात आचारसंहिता पथक व पोलिसांच्या मदतीने वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी जिल्हाबाहेरुन रोख रक्कम व इतर वस्तू येण्याची शक्यता असल्याने ही तपासणी सुरू आहे. जिंतूर येथील औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी रात्री उपअधीक्षक किशोर काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक ओव्हळ यांचे पथक वाहनांची तपासणी करत होते. साडे आठ वाजता देवगाव फाटय़ावर औरंगाबादकडून येणारी एमएच३८-३४४० या मोटारची तपासणी केली असता त्यामध्ये ८ किलो चांदी व अर्धा किलो सोन्याची बिस्किटे आढळून आली. याची बाजारात २४ लाख रुपये किंमत आहे. या दोन्ही मालाची पावती नसल्याने पोलिसांनी हा माल जप्त केला. कपिल अशोक सोनी, शुभम महावीर सोनी हे दोघे व्यापारी व चालक गजानन भिकाजी गलांडे (सर्व राहणार िहगोली) यांना अटक केली आहे. रात्री ९च्या दरम्यान याच रस्त्यावर जीजे ०५ एव्ही ५५४४ या क्रमांकाच्या खासगी बसची तपासणी केली असता या गाडीमध्ये ४३ लाख रुपयांची सिगारेट आढळून आली. ही गाडी नांदेडहून सुरतला चालली होती. याप्रकरणी गाडीचालक रामलाल डांगी यास अटक करण्यात आली आहे. रात्री साडेदहा वाजता जिंतूर पोलिसांनी जिंतूर शहरातील लॉजची तपासणी केली. शिवनेरी येथील लॉजमधून तीन लाख रुपयांच्या गर्भपाताच्या औषधांचा साठा जप्त केला. या प्रकरणी रामकेश मंगलप्रसाद वर्मा, भूपतीसिंह रामप्रसादसिंह (राहणार- कानपूर) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांच्या पथकात सहायक पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे, उपनिरीक्षक भाऊराव मगरे, बी. बी. तांबे, जाधव यांचा समावेश होता.
अर्धा किलो सोन्याची बिस्किटे, ८ किलो चांदी ४३ लाखांची सिगारेट, तीन लाखाची औषधे जप्त
जिंतूर-औरंगाबाद महामार्गावर नाकाबंदी करत असताना मोटारमधून अर्धा किलो सोन्याचे बिस्कीट, ८ किलो चांदी, तर खासगी आराम बसमधून ४३ लाख रुपयांचे सिगारेट व शहरातील एका लॉजमधून तीन लाख रुपयांची गर्भपाताची औषधे जिंतूर पोलिसांनी शनिवारच्या रात्री जप्त केली.
First published on: 24-03-2014 at 01:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Half kg gold biscuit 8kg silver cigarettes of 43 lakhs and medicine of 3 lakhs seized