गेल्या काही वर्षांमध्ये अनेक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना विरोध झाल्याचं आपण पाहिलं आहे. यापैकीच एक चित्रपट ‘हमारे बारह’ हा सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचं पोस्टर सादर केल्यापासूनच यावरून वाद निर्माण झाला आहे. अनेक मुस्लीम संघटना आणि राजकीय पक्षांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटावर सरकारने बंदी घालावी, हा चित्रपट कुठेही प्रदर्शित होऊ देऊ नये अशी मागणी केली आहे. दरम्यान, आता या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांनी दावा केला आहे की, त्यांना काही लोकांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे या कलाकारांनी काही वेळापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
या चित्रपटातील प्रमुख कलाकर आणि ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “आमचा आगामी चित्रपट ‘हमारे बारह’वरून वाद निर्माण झाला आहे. काही लोकांनी आमच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आम्हा कलाकारांनाही धमकी मिळाली आहे. आमचे निर्माते कमल चंद्रा, निर्माते रवी गुप्ता आणि इतर निर्मात्यांना शिरच्छेद करण्याची धमकी मिळाली आहे. आमचा हा चित्रपट ७ जून रोजी संपूर्ण देशात आणि इतर १५ देशांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी विनंती आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.”
अन्नू कपूर म्हणाले, “आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे की, त्यांनी आम्हाला सुरक्षा प्रदान करावी. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय आमच्या या विनंतीकडे गांभीर्याने पाहिलं जाईल. तसेच त्यांनी संबंधित विभागाला याप्रकरणी कारवाईचे आदेशही दिले आहेत. ते म्हणाले, आमच्या ‘हमारे बारह’ चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांना सुरक्षा प्रदान केली जाईल. एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले, ते मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यात जी व्यक्ती कायद्याचं पालन करतेय ती सुरक्षित असेल.”
हे ही वाचा >> छगन भुजबळ कोणत्या गटात आहेत? जयंत पाटील सूचक वक्तव्य करत म्हणाले, “उद्या संध्याकाळी…”
जितेंद्र आव्हाडांकडून ११ लाखांच्या बक्षीसाची घोषणा
जितेंद्र आव्हाड म्हणाले, जी व्यक्ती मला एका मुस्लीम व्यक्तीच्या घरात त्याची १० मुलं दाखवेल त्या व्यक्तीला मी ११ लाख रुपयांचं बक्षीस देईन. मुळात आता कुठल्याही मुस्लीम व्यक्तीला १० किंवा त्यापेक्षा अधिक मुलं नाहीत. असं चित्र कुठेही नसताना लोकांमध्ये गैरसमज का निर्माण केला जातोय.