लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वत्र दारुण पराभवाची चव चाखावी लागल्याने प्रदेश काँग्रेसवर अवकळा पसरली असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला ठरलेल्या नांदेडात पक्षाचा झेंडा फडकावला. मोदी लाटेत पक्षातील दिग्गजांची धुळधाण उडाली; पण त्यास अपवाद ठरल्यानंतर चव्हाणांनी नांदेडच्या मतदारांना सलाम ठोकला. ८१ हजार ४५५ मतांच्या फरकाने चव्हाण यांनी पाटील यांना पराभवाची धूळ चारली.
चव्हाण यांना ४ लाख ९३ हजार ७५, तर डी. बी. पाटील (भाजप) ४ लाख ११ हजार ६२० मते मिळाली. एकीकडे नांदेडात मोठा विजय प्राप्त करतानाच शेजारच्या िहगोलीतही पक्षाला विजयी करण्यास हातभार लावला. नांदेडात चव्हाणांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा एकतर्फी विजय होईल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु भाजप पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची अभूतपूर्व सभा झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. मोदींच्या सभेनंतर नकारात्मक वातावरण तयार होत असतानाच चव्हाण व त्यांच्या निकटवर्तीयांनी अत्यंत नियोजनपूर्वक प्रचारयंत्रणा राबवली. पक्षासह मित्रपक्षांमधील नेत्यांची नाराजीही दूर केली.
मागील वेळी नांदेडात काँग्रेसचे भास्करराव खतगावकर विजयी झाले होते. त्यांना सुमारे ४५ टक्के मते मिळाली होती. १९७७, १९८९ व २००४ चा अपवाद वगळता तब्बल १३ वेळा काँग्रेसने येथे विजय मिळवला. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीतून आलेल्या माजी खासदार डी. बी.पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. मात्र, मुंडेंचा निर्णय भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रुचला नाही. महायुतीच्या प्रचारातही मरगळ होती. मोदी लाटेवर डी. बी. स्वार होतील; असा मुंडेंना विश्वास होता. नांदेडच्या मतदारांनी तो फोल ठरविला. चव्हाणांच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
‘नांदेडच्या जनतेला सलाम’
महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात मोदीमय वातावरण असताना नांदेडच्या मतदारांनी काँग्रेस पक्षासह माझ्यावर विश्वास टाकला, त्याला मी सलाम करतो, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. नांदेडच्या मतदारांचा हा विजय आहे, असे सांगताना काँग्रेससह मित्रपक्षांनी केलेल्या सहकार्यामुळे हा विजय सुकर झाला, असेही ते म्हणाले.
हिंगोलीतही काँग्रेसचा झेंडा
हिंगोली – हिंगोली मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे राजीव सातव यांनी निर्णायक आघाडी घेत शिवसेनेचे खासदार सुभाष वानखेडे यांचा अवघ्या १ हजार ६३२ मतांनी पराभव केला. निकाल जाहीर करण्यापूर्वी सेना उमेदवाराकडून झालेली फेरमतमोजणीची मागणी निवडणूक अधिकारी नरेंद्र पोयाम यांनी मान्य केली. त्यामुळे विजयाची अधिकृत घोषणा उशिरापर्यंत झाली नव्हती. सातव यांना ४ लाख ६६ हजार ४८३, तर वानखेडे यांना ४ लाख ६४ हजार ७२९ मते मिळाली.
मतमोजणीत २१ व्या फेरीपर्यंत वानखेडे आघाडीवर होते. २२ व्या फेरीत सातव यांनी १ हजार ७३२ मतांची आघाडी घेतली, ती कायम राखली. २४ व्या फेरीत सातव यांना ४ लाख ६६ हजार ४८३, तर वानखेडे यांना ४ लाख ६४ हजार ७२९, तसेच सातव यांना ९१४ व वानखेडे यांना १ हजार ३६ टपालाची मते मिळाली. शेवटच्या फेरीत सातव यांना १ हजार ६३२ मते अधिक होती. निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पोयाम निकाल जाहीर करण्याच्या तयारीत असताना सेनेच्या निवडणूक प्रतिनिधींनी फेरमतमोजणीची मागणी केली. ती पोयाम यांनी मान्य केली व उशिरापर्यंत फेरमतमोजणी सुरू केली. त्यामुळे अधिकृत निकाल जाहीर झाला नव्हता.

Story img Loader