संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरू व कसाबला फाशी दिल्याने तसेच यासीन भटकळ, तुंडा या दहशतवाद्यांना अटक केल्याचा राग आल्याने पाकिस्तान घुसखोरी करत आहे, असा आरोप करत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सीमेलगत रस्ते व कुंपणाचे काम पूर्ण केले जाईल असे सांगितले.
काँग्रेस पक्षाच्या वचनपूर्ती मेळाव्यात गृहमंत्री िशदे बोलत होते. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार बाळासाहेब विखे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार शरद रणपिसे आदी उपस्थित होते.
गृहमंत्री शिंदे म्हणाले, पाकिस्तान आता भारताकडे वेगळय़ा नजरेने  बघतो आहे. अफजल गुरूच्या फाशीचा निर्णय घेण्यास अडचणी होत्या. पण देशाने खंबीरपणे कृती केली. त्यामुळे पाकची गडबड सुरू आहे.
आता घुसखोरी थांबत आली आहे. मी मंगळवारी घुसखोरी झालेल्या सांबा विभागाला भेट देणार आहे. देशाच्या सीमेच्या कडेला अनेक भागांत रस्ते व कुंपणे नाहीत.  अर्थसंकल्पात त्याकरिता तरतूद केली आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
निवडणुका जवळ आल्याने भारतीय जनता पक्ष व अन्य विरोधी पक्ष हे जातीय दंगे घडवून लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काँग्रेसजनांनी दक्ष राहावे. काँग्रेसचे सर्वधर्मसमभावाचे राजकारण समाजाला पुढे नेईल.
सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याचे काम विरोधक करतात, पण स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस पक्षाला संस्कार आहेत. त्यामुळे दोघांनीही विरोधकांना टीका करण्याची संधी दिलेली नाही. पक्षांतर्गत भांडणे, गटतट सोडून कामाला लागावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांनी केले. या वेळी महसूलमंत्री थोरात, जिल्हाध्यक्ष ससाणे, आमदार रणपिसे आदींची भाषणे झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा