सोलापूर : देशाचा सर्वांगीण विकास करताना गोरगरीब जनतेचे सुखी जीवनाचे स्वप्न पूर्ण होत असल्याबद्दल त्यांच्याकडून मिळणारा आशीर्वाद हेच माझे सर्वात मोठे भांडवल आहे. पूर्वीच्या सरकारांनी केवळ ‘गरिबी हटाव’च्या घोषणा केल्या, प्रत्यक्षात गरिबी दूर झाली नव्हती. आमचे सरकार ठोस काम करून गरिबी हटवत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले.
सोलापूरजवळ कुंभारी येथे ३० हजार असंघटित कामगारांसाठी उभारलेल्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांसह राज्यातील सुमारे ९० हजार घरांचे वितरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी समारंभपूर्वक करण्यात आले. या वेळी सुमारे एक लाख जनसमुदायासमोर बोलताना त्यांनी, ‘‘भगवान श्रीरामाने दिलेल्या सत्यवचनाच्या शिकवणीतून हजारो गरीब कामगारांना हक्काची घरे देण्याचा संकल्प साकार होताना मिळणारा आनंद अधिक आहे,’’ असे भावपूर्ण उद्गार काढले.
हेही वाचा >>> शब्दपूर्तीच्या कार्यातून ‘मोदी हमी’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधानांवर स्तुतिसुमने
असंघटित कामगारांसाठीच्या या गृहप्रकल्पाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, ९ जानेवारी २०१९ रोजी देशातील या सर्वात मोठया गृह योजनेचे भूमिपूजन मी केले होते. नंतर घरांच्या चाव्या देण्यासाठीही मीच येणार असल्याची हमीही दिली होती. त्याप्रमाणे आज ही हमी पूर्ण करत आहे. ‘‘‘मोदी गॅरंटी’ पूर्ण होण्याची ही ‘गॅरंटी’ आहे. मिळालेली घरे ही लाखो गरीब कामगारांची संपत्ती आहे. लाभार्थी कामगारांना पिढयानपिढया भोगावे लागलेले कष्ट, हालअपेष्टा आता त्यांच्या नव्या पिढीला झेलावे लागणार नाहीत,’’ असा आशावादही पंतप्रधानांनी या वेळी व्यक्त केला.
या वेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, माढयाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सांगलीचे खासदार संजय पाटील, भाजपचे आमदार विजय देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते. या प्रकल्पाचे प्रवर्तक नरसय्या आडम यांनी स्वागत केले.
हेही वाचा >>> शेतकऱ्यांविषयी मोदी सरकारला आस्था नाही; शरद पवार यांची टीका
आपले सरकार गरिबांच्या विकासासाठी बांधील असून, त्या दृष्टीने गेल्या १० वर्षांत विविध पावले उचलल्याचे नमूद करत मोदी म्हणाले, की राजकारणात दोन विचार असतात.. एक लोकांच्या भावना भडकावण्याचा, त्यांच्याशी खोटे बोलून स्वार्थ साधण्याचा, तर दुसरा चांगल्या धोरणांमधून गोरगरिबांचे कल्याण साधण्याचा. माझ्या सरकारने गरिबांच्या प्रश्नांचा नेमका अभ्यास करत त्यावर उपाययोजना केल्या आहेत. ‘‘विविध योजनांचे फायदे आता थेट लाभार्थ्यांना मिळू लागले आहेत. पूर्वी अशा योजना, त्याचे लाभ हे मधले लोकच घेत होते. लाखो खोटया नोंदी करून सरकारची लूट केली जात होती; गरिबांनाही लाभांपासून वंचित ठेवले जात होते. आता संबंधित लाभार्थ्यांचा मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक आणि बँक खाते या तीन गोष्टी एकमेकांशी जोडल्यामुळे कोणालाही भ्रष्टाचार करता येत नाही,’’ असेही मोदी म्हणाले.
काँग्रेस राजवटीतील ‘गरिबी हटाव’ घोषणेचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, या लोकांनी कित्येक वर्षे ‘गरिबी हटाव’च्या घोषणा दिल्या. पण त्यातून गरीब वर्गाच्या जगण्यात काहीच फरक पडला नाही. मात्र, या भ्रष्ट नेत्यांची गरिबी दूर होऊन ते श्रीमंत झाले. मी सामान्यांच्या सुखी जीवनाच्या छोटया-मोठया स्वप्नांना आकार देत आहे. सर्वांनी नेहमी मोठीच स्वप्ने पाहावीत, त्यासाठी आपले सरकार साथ देईल.
पूर्वी घरे आणि शौचालयांअभावी माता-भगिनींना अपमानित जीवन जगावे लागत असे. आता देशात घरोघरी स्वच्छतागृहे आहेत. आपल्या सरकारने २५ कोटी जनतेला दारिद्रयरेषेतून बाहेर काढले असून चार कोटी घरे आणि दहा कोटी स्वच्छतागृहे बांधून दिली आहेत. देशभर रस्त्यांचे मोठे जाळे विणले जात आहे. घर, स्वच्छतागृहे, पाणी, वीज, रस्ते, आरोग्य या मूलभूत सुविधा देण्यासाठीही आपल्या देशाला एवढी वर्षे वाट पाहावी लागली हे दुर्दैवी आहे, अशी टिप्पणी मोदी यांनी केली.
मोदी भावूक
घरांच्या हस्तांतरणप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड भावूक झाले. ‘‘ही घरे जेव्हा मी पाहत होतो, तेव्हा आपल्यालाही लहानपणी राहायला असे एखादे घर मिळाले असते तर..’’ हे वाक्य उच्चारताना त्यांचे मन हळवे झाले. गळा दाटून आला. काही वेळ ते नि:शब्द झाले. त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले. पुढची काही मिनिटे त्यांनी कातर स्वरांत भाषण केले.
१२०१ कोटींची विकासकामे
मोदी यांच्या हस्ते १२०१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन झाले. यामध्ये कुपवाड (सांगली), भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली या महापालिका, तसेच सातारा, शेगाव आणि भद्रावती या नगरपालिकांसाठी अमृत २ योजनेतून पाणीपुरवठा आणि मलनि:सारण व्यवस्थापन विकासकामांचा समावेश आहे. महाराष्ट्रात अनेक नव्या राष्ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण होत आली आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची कामे पूर्ण होत आली असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.