टीम इंडियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा क्रिकेटमध्ये पराभव करताच सांगली-मिरज शहरात फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. उत्साही तरूणांनी दुचाकी वाहनांचे हॉर्न वाजवित फेरी मारत आपला आनंद व्यक्त केला. दिवसभर सामना पाहण्यात नागरिक मग्न असल्याने शहरात संचारबंदीसदृश अवस्था निर्माण झाली होती. भारतीय संघाच्या विजयानंतर सांगलीत गुलालाची उधळण करीत साखर वाटण्यात आली.
आज सकाळपासून तरूणांपासून वयस्करांपर्यंत सर्व जण दूरचित्रवाणीच्या पडद्यासमोर बसून भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा आनंद घेत होते. दिवसभर रस्ते ओस पडले होते. रविवारीची सुटी असतानाही बाजारपेठेत ग्राहक क्वचितच येत असल्याने बरीच दुकाने आज सकाळी ११ वाजलेपासून बंद ठेवण्यात आली होती.
    भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहोचताच प्रत्येक क्षणाला फटाक्यांची आताषबाजी करण्यात येत होती. भारताचा विजय निश्चित होताच तरूणाई दुचाकीचे हॉर्न वाजवित गल्ली बोळासह मुख्य मार्गावर भगवे निशाण घेऊन जल्लोष करीत फिरत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहण्यास मिळाले. सांगली शहरातील राजवाडा चौक, गणपती पेठ, पटेल चौक, गावभाग मारूती चौक, विश्रामबाग, मिरजेत गांधी चौक, महाराणा प्रताप चौक आदी ठिकाणी तरूण वर्ग मोठय़ा प्रमाणात जमला होता. फटाक्यांची आताषबाजीही करण्यात आली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी मिरजेत पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. याशिवाय गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस गस्तीसाठी फिरत होते.
करवीरनगरीत जल्लोष
प्रतिनिधी,  कोल्हापूर  
विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील पहिल्या सामन्यात भारताने रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर करवीरनगरी क्रिकेट रसिकांच्या आनंदाला उधाण आले होते. सामान्य नागरिकांनीही दिवाळी आणि रंगपंचमी या दोन्ही सणांचा आनंद एकत्रितरीत्या लुटला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाटात युवक वर्ग रस्त्यावर उतरला होता. अवघी तरुणाई मोटरसायकल रॅली काढत मध्यवर्ती शिवाजी चौकात एकवटल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. एकमेकांवर गुलालाची उधळण करत हे तरुण भारताचा जयघोष करत होते.
    विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील भारताची सलामी रविवारी अॅडलेड येथे पाकिस्तान विरोधात झाली. पारंपरिक शत्रूशी सामना असल्याने क्रिकेटरसिकांचे डोळे सकाळपासूनच सामन्याकडे लागले होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सहकुटुंब व मित्रांसमवेत सामना पाहण्याचा आनंद लुटण्यात आला.  
    शहातील गल्लोगल्ली दिवाळी सणाप्रमाणे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावर समाधानी न होता गुलालाची उधळण करत रंगपंचमीच्या सणाचा आनंदही लुटला. उत्साही तरुणाईने दुचाकी आणि मोटरसायकलवरून मिरवणूक काढली. तिरंगा व भगवा ध्वज खांद्यावर घेतलेल्या तरुणाईकडून भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष केला जात होता. मध्यवर्ती शिवाजी चौकात शहरातील अवघी तरुणाई जमली होती. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून क्रिकेटप्रेमींनी पुतळ्याच्या साक्षीने विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. हजारो क्रिकेटप्रेमींच्या उपस्थितीने शिवाजी पुतळा परिसर फुलून गेला होता. या आनंदात तरुणाई, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, गृहिणी अशा सर्वाचाच समावेश होता.
    दरम्यान इचलकरंजी शहरातील चांदणी चौक, झेंडा चौक, सांगली रोड, गांधी पुतळा, सुतार मळा, शिवाजी पुतळा या सर्वच ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत जल्लोष सुरू होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवाजीनगर, गावभाग, शहापूर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तनात केला होता. सायंकाळी उशिरा राजवाडा चौकात काही उत्साही तरुणांनी एका एस.टी. मधील प्रवाशांवर गुलाल उधळल्यानं काहीसा तणाव निर्माण झाला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा तणाव निवळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा