कोकणातील एकमेव नगदी पीक म्हणून ओळखला जाणाऱ्या हापूस आंब्याचे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी उत्पादन समाधानकारक असले तरी परराज्यातील आंब्याशी वाढत्या स्पध्रेला तोंड द्यावे लागत असल्याने आर्थिक उत्पन्नाला फटका बसत असल्याचे चित्र आहे.
बदलत्या हवामानामुळे गेली काही वष्रे कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला होता. यंदाही फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उन्हाळय़ाच्या झळा जाणवू लागल्या आणि त्याचा परिणाम कैरीच्या अवस्थेत असलेला आंबा भाजणे, गळणे किंवा काही आंबा अपेक्षेपेक्षा जास्त लवकर तयार होण्यावर झाला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोकणातून दररोज सुमारे तीन-साडेतीन हजार पेटय़ा आंबा वाशीच्या घाऊक बाजारपेठेत गेला होता. यंदा तेच प्रमाण जवळजवळ तिप्पट झाले. त्यामुळे ऐन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याचे दर घसरण्याचा अनपेक्षित प्रकार घडला. दर वर्षी देवगडच्या सुप्रसिद्ध हापूस आंब्याने या बाजारपेठेतील आंब्याच्या उलाढालीचा मौसम सुरू होत असे. पण यंदा परराज्यातील आंबा फेब्रुवारी महिन्यातच तेथे पोचल्यामुळे देवगड हापूसला फटका बसला. संदर्भात येथील प्रसिद्ध बागायतदार प्रसन्न पेठे म्हणाले की, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, दिल्ली इत्यादी भागांतील आंबा एप्रिल-मेमध्ये बाजारात मोठय़ा प्रमाणावर येतो. यापैकी काही, विशेषत: केरळ-कर्नाटकातील आंबा हापूसच्या नावाने बेमालूमपणे बाजारात विकला जातो. हापूस निवडीबाबत अज्ञानी असलेले ग्राहक तो आंबा पसंत करीत असून त्याचा फटका अस्सल हापूसला बसत आहे. कॅनिंगसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या आंब्याबाबतही हेच घडत असून या क्षेत्रातील काही कंपन्या गटबाजी करून दर पाडत असल्याची शंका घेण्यास वाव आहे.
वाशीच्या घाऊक बाजारपेठेतील प्रमुख व्यापारी संजय पानसरे म्हणाले की, दक्षिणेकडील पाचही राज्यांमध्ये आंब्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन सुरू झाले आहे. यापैकी केरळचा आंबा तर डिसेंबर-जानेवारीपासूनच सुरू होतो आणि तो हुबेहूब कोकणातील हापूससारखा दिसतो. त्यापाठोपाठ आपल्या आंब्याबरोबरच कर्नाटकचा आंबा येऊ लागतो. आजही वाशीच्या बाजारपेठेत कोकणातील हापूसच्या ५४ हजार ३०० पेटय़ा, तर कर्नाटक हापूसच्या ४१ हजार ६३० पेटय़ांची आवक झाली. आणखी सुमारे आठवडाभरात गुजरातचा हापूस सुरू होईल.
या सर्व राज्यांच्या किनारपट्टीच्या भागातील आंबे सर्वसाधारणपणे सारखेच असतात. त्यामुळे कोकणच्या हापूसला स्पर्धा वाढली आहे. आधी भाजणारा उन्हाळा आणि गेल्या काही दिवसांत पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे बाजारात आंब्याची आवक आणखीच वाढली आहे. त्याचाही दरावर परिणाम होत आहे. पण लवकरच सुरू होत असलेल्या रमझानमुळे हंगामाचा शेवट गोड होईल, अशी आशा हे बागायतदार बाळगून आहेत.
- रत्नागिरी व देवगडच्या हापूस आंब्याला नुकतेच भौगोलिक उपदर्शन प्राप्त झाले आहे. त्याचा फायदा यंदा नाही, तरी पुढील हंगामापासून मिळू लागेल असा अंदाज आहे.
- तसे झाले तर परराज्यातून येणाऱ्या आंब्याशी करावी लागणारी अनिष्ट स्पर्धा बऱ्याच प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा कोकणातील बागायतदार बाळगून आहेत.
- त्याचबरोबर राज्य पणन मंडळाच्या मदतीने कोकणातील आंबा बागायतदार राज्यातील बाजारपेठांमध्ये थेट उतरले तर त्याचाही चांगला लाभ होऊ शकेल.