उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजांच्या यादीत ढकलले गेलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हरिभाऊ बागडे आता रावसाहेब दानवे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांच्या प्रचारासाठी सिल्लोड व फुलंब्री येथे घेतलेल्या जाहीर सभांमध्ये बागडे सहभागी झाले होते. बागडे या वेळेस जालना लोकसभा मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु पक्षाने चौथ्यांदा दानवे यांनाच उमेदवारी दिली. त्यानंतर दानवे यांच्या औरंगाबाद येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते झाले, तेव्हा आणि जालना येथील प्रचार कार्यालय उद्घाटनासही ते अनुपस्थित होते. तसेच दानवे यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हाही बागडे हजर नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्या वेळी आपण लवकरच प्रचारात सहभागी होणार आहोत, असे त्यांनी सांगितले होते.
सिल्लोड व फुलंब्री येथील सभेत बोलताना फडणवीस यांनी यूपीए सरकारच्या मागील १० वर्षांतील कारभारावर टीका केली. विरोधकांनी मोदींचा धसका घेतला असून या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या भाग्याचा नव्हे तर देशातील जनतेच्या भाग्याचा फैसला होणार असल्याचे ते म्हणाले. उमेदवार दानवे, हरिभाऊ बागडे आदींची भाषणे या वेळी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा