Harshvardhan Patil Joins NCP Sharad Pawar Remark on Supriya Sule Lok Sabha Victory : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवार सुनेत्रा पवार यांचा मोठ्या मतफरकाने पराभव केला. दरम्यान, “सुप्रिया सुळे यांच्या या विजयात आमचाही अप्रत्यक्ष सहभाग होता”, असं वक्तव्य माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पार्टीत होते आणि आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (शरद पवार) प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशावेळी पाटील म्हणाले, “सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचाही अप्रत्यक्ष सहभाग होता”. याचा अर्थ पाटील भाजपात असतानाही त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याऐवजी सुप्रिया सुळे यांना विजयी करण्यात हातभार लावला होता.
इंदापूर येथे आज हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (शरद पवार) प्रवेश झाला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार धैर्यशील मोहिते, शरद पवार गटाचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांच्यासह पक्षातील अनेक मोठे नेते उपस्थित होते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांना पक्षात सहभागी करून घेतलं. यावेळी हर्षवर्धन पाटलांनी जयंत पाटलांचे आभार मानले. पाटील म्हणाले, “जयंतराव आपण १५ वर्षे एकत्र काम केलं आहे. आज तुम्ही या पक्षाचे अध्यक्ष आहात आणि मला तुम्ही या पक्षात सहभागी करून घेतलं. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे”.
“सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग”
हर्षवर्धन पाटील म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे सुप्रिया सुळे चार वेळा खासदार झाल्या आहेत. आधी तीन वेळा जेव्हा त्या खासदार झाल्या, त्यावेळी त्यांच्या विजयात थोडंफार का होईना, आमचंही प्रत्यक्ष योगदान होतं. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजयात आमचा अदृश्य हात होता. हर्षवर्धन पाटलांच्या यावा वक्तव्यानंतर उपस्थितांनी हसून दात दिली.
हे ही वाचा >> Raj Thackeray : राज ठाकरेंनी सुनावले खडे बोल, “देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतक्या खालच्या…”
“…तेव्हा जयंत पाटील मला म्हणायचे, तिकडे का थांबलात, त्यापेक्षा इकडे या” : हर्षवर्धन पाटील
पाटील म्हणाले, मी या पक्षात प्रवेश करण्यापूर्वी माझी आणि जयंत पाटील यांची जेव्हा जेव्हा भेट व्हायची, आमचं भेटणं किंवा बोलणं व्हायचं, आम्ही फोनवर बोलायचो तेव्हा जयंत पाटील मला म्हणायचे, तिकडे का थांबला आहात, त्याऐवजी इकडे या. कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो. त्यानुसार आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (शरद पवार) आलो आहे.