Harshwardhan sapkal On Devendra Fadnavis: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना मुघल सम्राट औरंगजेबाशी केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांनी दोन्ही राज्यकर्ते धर्माचा सत्तेसाठी वापर करणारे “क्रूर शासक” असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपातून तीव्र पडसाद उमठताना पाहायला मिळत आहे. भाजपाने काँग्रेसवर महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करण्याचा आणि राजकारण आणखी खालच्या पातळीला नेल्याचा आरोप केला आहे.

यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला प्रत्युत्तर देत भाजपाचे लोकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करत असल्याचे म्हटले आहे.

यावर बोलतना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “आत्याचार आणि हिंसाचाराच्या माध्यमातून राज्यात या सरकारचा उद्रके पाहायला मिळतोय, तो अत्यंत वाईट आणि क्रूर स्वरूपाचा आहे. या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कारभार आणि औरंगजेबाचा कारभार सारखाच असल्याचं विधान मी केलंं होतं. यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही.”

फडणवीस यांचं सरकारही तेवढ्याच क्रूर पद्धतीने…

“औरंगजेबाने आपल्या भावाचा खून केला, वडिलांना अटकेत टाकलं, लहान भावाला वेडं ठरवलं. याच्याबरोबर त्यानं छत्रपती संभाजी महाराजांनाही छळलं. त्यामुळे औरंगजेब निश्चित क्रूर होता. देवेंद्र फडणवीस यांचं सरकारही तेवढ्याच क्रूर पद्धतीने कारभार करत आहे असं माझं विधान होतं”, असं सपकाळ म्हणाले.

भाजपाच्या लोकांनीच तुलना केली

ते पुढे म्हणाले, “माझ्या या विधानाच्या संदर्भात भाजपाची का पोटदुखी झाली हे समजत नाही. मी काही विचित्र बोललो नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काही अपशब्द वापरले नाहीत. कुठे त्यांचा ऐकेरी उल्लेख केला नाही. मी शुद्ध पद्धतीने या सरकारच्या कारभारावर टीका केली होती. मात्र, असे असताना कालपासून भाजपाचेच जे लोकं आहेत, यांनीच थेट देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना केली आहे.”

हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले होते?

“औरंगजेब हा क्रूर शासक होता. औरंगजेबाने स्वत:च्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. तसेच औरंगजेब हा नेहमी धर्माचा आधार घ्यायचा. औरंगजेब हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीस सरकार देखील तेवढेच क्रूर आहे. ते देखील कायम धर्माचा आधार घेतात. त्यामुळे दुर्देवाने औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हा सारखाच आहे”, असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं.