Harshvardhan Sapkal: राज्यात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने काँग्रेससह महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनाम दिल्याने माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हाती प्रदेश काँग्रेसची सूत्रे आली आहेत. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून सपकाळ यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. अशात त्यांनी आता भाजपाच्या ऑपरेशन कमळबाबतही भाष्य केले असून, लोक आपल्याला सत्तेतून काढून टाकतील याची भीती असल्याने भाजपा सतत इतर पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घेत असल्याचे म्हटले आहे.

लोक आपल्याला सत्तेतून काढून टाकतील…

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “ऑपरेशन कमळची आणि आता कोण जाणार याची चर्चा अधून-मधून होत राहते. भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यांच्याकडे महायुतीचे २३७-२३८ आमदार आहेत. आता येवढे मोठे बहुमत मिळाल्यावरही यांना दुसरे पक्ष फोडावे वाटतात यामागे काय कारण आहे? सतत आपल्या पक्षा लोक घेत राहणे ही कोणती भीती आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, एक दिवस लोक आपल्याला सत्तेतून काढून टाकतील याची त्यांना भीती आहे.” दरम्यान एबीपी माझाच्या, माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी ऑपेरेशन कमळबाबत विधान केले आहे.

औंरगजेबाशी केली होती फडणवीस यांची तुलना

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केलं होतं. “औरंगजेब क्रूर शासक होता, आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

माफी न मागण्यावर सपकाळ ठाम

यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत आपण वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणत माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केले होतं. ते म्हणाले होते की, “मी जे विधान केलं ते विधान राज्यकारभाराच्या अनुषंगाने होतं. औरंगजेब ज्या क्रूर पद्धतीने राज्यकारभार चालवत होता, त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कारभार चालला आहे, असं विधान केलं होतं. त्या विधानावर मी अद्यापही ठाम आहे. जसं औरंगजेबाने जिझिया कर लावला होता, तसाच कर आता महाराष्ट्रातील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस लावत आहेत. शाळेच्या वह्या, पुस्तकावर कर लावला, स्मशान भूमीतील लाकडांवरही कर लावला आहे. त्यामुळे ही सर्व कार्यप्रणाली त्याच प्रकारची आहे”, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते.

Live Updates

Story img Loader