Harshvardhan Sapkal : गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. औरंगजेबाची कबर पाडण्याच्या संदर्भात काही संघटनांनी मागणी केली होती. यातच काही दिवसांपूर्वी नागपुरात दंगलीची घटना घडली. तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणही अद्याप चर्चेत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का?’, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास महाराष्ट्राच्या गृहविभागाला अपयश आलं असून आता महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री मिळायला हवे, अशी मोठी मागणी देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
“महाराष्ट्राला आज पूर्णवेळ गृहमंत्री नाहीत. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असले पाहिजेत. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण घडलं, याबरोबरच महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना पाहता आम्ही गृहमंत्र्यांना राजीनामा मागितला आहे आणि आताही मागत आहोत. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचा एक नव्याने प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे. महाराष्ट्राचा गृहविभाग घाशिराम कोतवाल चालवत आहे का? असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहून उपस्थित होत आहे. सध्या महाराष्ट्रात घाशिराम कोतवाली कारभार गृहविभागाचा सुरु आहे”, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
‘देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली कारण…’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेबासारखाच आहे, असं मी म्हटलं होतं. याचं कारण म्हणजे ते करत असलेला कारभार आहे. आगामी काळात सद्भावना बाळगूनच समाजासाठी काम करण्याची माझी पक्षीय आणि व्यक्तिगत इच्छा आहे. औरंगजेबाचा दाखला देत मी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नसून ते वक्तव्य कारभाराच्या अनुषंगाने होतं. ज्या घटना सध्या राज्यात घडत आहेत त्यामागचं वास्तव अत्यंत क्रूरपणे एकापाठोपाठ एक उजेडात येत आहे. हा घटनाक्रम लक्षात घेता मी ते वक्तव्य केलं होतं, असं स्पष्टीकरण सपकाळ यांनी दिलं.