Harshvarrdhan Patil: महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकजण त्यांचे अभिनंदन व्यक्त करत आहेत. महायुतीमधील नेत्यांसह महाविकास आघाडीचेही नेते देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन व्यक्त करत आहेत. “भाजपामध्ये आल्यावर शांत झोप लागते…”, असे विधान हर्षवर्धन पाटील यांनी केले होते. हे विधान बरेच गाजले. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी इंदापूरची जागा मिळावी म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण त्यांना याही वेळी तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हर्षवर्धन पाटील यांनी काय म्हटलं आहे?

“आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या हातून राज्यातील जनतेची सेवा घडेल, आपले राज्य बलशाही बनेल, या सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या हिताचे निर्णय होतील, हीच अपेक्षा. त्यांना उज्वल महाराष्ट्र घडवण्याची पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा”, अशी पोस्ट हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. त्यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकीआधी हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांना महायुतीमुळे तिकीट मिळत नव्हते, म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये हर्षवर्धन पाटील यांना मानाचं स्थान देण्यात आलं आहे.

शपथविधीला विरोधकांची अनुपस्थिती

देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शरद पवारांना फोन करुन शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, महाविकास आघाडीतील नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला. मविआचे बडे नेते देखील शपथविधीला हजर राहिले नाहीत. या सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं पण ते त्यांच्या वैयक्तिक गोष्टींमुळे येऊ शकले नसतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करणारी पोस्ट टाकल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harshvarrdhan patil meets devendra fadnavis after he become chief minister of maharashtra scj