Harshwardhan Sapkal On Ravindra Dhangekar : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यातच दोन दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्‍स ठेवलं होतं. त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्समधील फोटोत त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांचं नेमकं काय चाललंय? असे सवाल अनेकांनी उपस्थित केले. रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या स्टेट्समुळे ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाष्य केलं आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चांसंदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “रवींद्र धंगेकर हे कालही काँग्रेसबरोबर होते आणि आजही आहेत”, अशी एका वाक्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली.

रवींद्र धंगेकरांचं स्टेट्‍स काय होतं?

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या स्टेट्सला गळ्यात भगवं उपरणं घातलेला एक फोटो ठेवला होता. त्या फोटोवर स्टेट्सला ‘तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी…’ हे गाणे ठेवल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर त्यांचं हे स्टेट्‍स सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं आणि त्यानंतर ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या.

रवींद्र धंगेकरांना उदय सामंतांनी दिली ऑफर

शिवसेना पक्षाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांच्याबाबत सूचक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, “रवींद्र धंगेकर यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केलेला फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्‍सला ठेवला होतं असं मी पाहिलं. त्याबाबत मी बोललो की त्यावर धनुष्यबाण आला तर आम्हाला आवडेल. तसेच मी रवींद्र धंगेकर यांना निमंत्रण दिलं आहे. कारण त्यांच्या सारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला जर ताकदीने काम करायचं असेल आणि सामाजिक क्षेत्रात काम करायचं असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही”, असं उदय सामंत यांनी म्हटलं होतं.

धंगेकर आणि शिंदेंच्या भेटीची चर्चा

काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होती. रवींद्र धंगेकर यांनी अचानक घेतलेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, त्यानंतर या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना आपण वैयक्तिक कामाच्या संदर्भात भेट घेतल्याचं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिलं होतं. “माझ्या वैयक्तिक कामासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना माझ्या वैयक्तिक कामाचं स्वरुप सांगितलं, तेव्हा ते काम करून देतो बोलले. त्यांच्याकडे काम असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची गरज पडली”, असं रवींद्र धंगेकर तेव्हा म्हणाले होते.

Story img Loader