Harshwardhan Sapkal on Uddhav Thackeray and Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (ठाकरे) या दोन पक्षांच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. मराठीच्या मुद्द्यावर या दोन पक्षांनी, अर्थात या पक्षांचे प्रमुख राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी अनेकांची इच्छा आहे. ती इच्छा पुढील काही दिवसांत पूर्ण होऊ शकते. कारण, राज्य सरकारने राज्यातील मराठी शाळांमध्ये हिंदी भाषा शिकणं सक्तीचं केल्यामुळे या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे याबाबतीत आघाडीवर आहेत. दोघांच्याही पक्षांच्या अजेंड्यावर मराठीचा मुद्दा सुरुवातीला असतो. त्याप्रमाणे दोन्ही पक्षांनी राज्य सरकारविरोधात कडवट भूमिका घेतली आहे.
मनसे व ठाकरे गट राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला, सत्ताधाऱ्यांकडून सरकारच्या निर्णयाचं समर्थन होत आहे, तर राज व उद्धव एकत्र येण्याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. दुसऱ्या बाजूला, महाविकास आघाडीतील इतर पक्ष म्हणजेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. मात्र, सध्या तरी त्यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली नाही.
काँग्रेस व राष्ट्रवादीची (शरद पवार गट) भूमिका काय?
उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार असतील तर त्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे दोन पक्ष काय भूमिका घेतील, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, काँग्रेस व शरद पवार गटाने या हालचालींचं स्वागत केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “आम्ही काँग्रेसवाले म्हणजेच भारत जोडोवाले आहोत, दोन कुटुंब एकत्र असतील तर त्यावर आक्षेप घेण्याची गरज नाही.”
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले…
हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “भाजपा महाराष्ट्राचे नुकसान करत आहे. उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत. भाजपा व महायुती महाराष्ट्राच्या मुळावर उठली आहे असा त्यांचा इशारा असल्याची दाट शक्यता आहे. भाजपा महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे ते महाराष्ट्र धर्माचे नुकसान करत आहेत. शिव, शाहु, फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या राज्यात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची परंपरा आहे. पण भाजपा मात्र महाराष्ट्राची भाषा व संस्कृती तोडण्याचे काम करत आहे. याला राज ठाकरे यांच्या विचारातून दुजोरा मिळत आहे. आम्ही भारत जोडोवाले आहोत, कुटुंब फोडणारे नाही. दोन परिवार एकत्र येत असतील तर आक्षेप घेण्याची गरज नाही.”