गेल्या आठवडय़ात झालेला अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे जालना जिल्ह्य़ात ५५ हजार एकरपेक्षा अधिक  क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. जालना जिल्हा प्रशासनाने या संदर्भातील अहवाल विभागीय आयुक्तांच्या मार्फत राज्य शासनाकडे पाठविला आहे.
या अहवालानुसार गारपीट आणि वादळी पावसामुळे जिल्ह्य़ात २ हजार ४७२ हेक्टर (जवळपास ६ हजार एकर) क्षेत्रावरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. तर २० हजार १२० हेक्टरवरील म्हणजेच ५० हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील अन्य पिकांचे नुकसान झाले. मागील वर्षी राज्यात सर्वात कमी पाऊस पडल्याने दुष्काळाचा मोठा फटका बसलेल्या जालना जिल्ह्य़ात या वर्षी फेब्रुवारीअखेरीस गारपीट आणि वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
पालकमंत्री राजेश टोपे यांनी गारपीट झाल्यानंतर तातडीने घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील दहा गावांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली असता पिकांचे झालेले नुकसान मोठे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. जालना बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी राज्याचे मदतकार्य व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांच्याकडे जालना जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना विशेष आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली आहे. जि. प. अध्यक्षा आशाताई भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेतही शेतकऱ्यांना दर एकरी ५० हजारांची मदत शासनाने करावी, अशी मागणी करण्यात आली. सतीश टोपे, अनिरुद्ध खोतकर, राजेश राठोड यांच्यासह अन्य सदस्यांनी या सभेत जिल्ह्य़ातील पिकांच्या झालेल्या नुकसानीबद्दल तपशीलवार माहिती दिली. त्यानंतर गारपीट व वादळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष अर्थसहाय्य देण्याची मागणी करणारा प्रस्ताव संमत करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा