एकीकडे राष्ट्रीयीकृत बँकांचा असहकार, दुसरीकडे तलाठय़ांची लाचखोरी अशा कात्रीत अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पीकविमा भरण्याची अंतिम तारीख शुक्रवारी संपली. मात्र, अजूनही अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचितच राहिले आहेत.
गेल्या वर्षी परभणी जिल्ह्यात विम्याच्या रकमेपोटी शेतकऱ्यांना १०७ कोटी रुपये प्राप्त झाले. त्यामुळे विम्याबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. गेल्या वर्षीची नापिकी लक्षात घेता, तसेच यंदा दुष्काळाचे सावट पाहता शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून या वर्षी विम्यासाठी रांगा लावल्या. खरीप हंगाम हातचा गेला; पण विम्यापोटी पुढे काही तरी मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्यामुळेच या वर्षी पीकविम्याची रक्कम व प्रस्ताव दाखल करण्यासाठी सहकारी बँकांमध्ये शेतकऱ्यांची झुंबड उडाली. गेल्या ५ दिवसांपासून जिल्हा बँकेच्या सर्वच शाखांमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही, अशी स्थिती होती. राष्ट्रीयीकृत बँकांच्या आडमुठय़ा धोरणामुळे केवळ जिल्हा बँकेतच शेतकऱ्यांना पीकविमा भरावा लागला. परंतु वेळ व कर्मचारी अपुरे पडल्याने रांगेत उभे राहूनही अनेक शेतकऱ्यांना अखेरच्या दिवशी पीकविमा भरता आला नाही.
पीकविम्याची मुदत वाढली, अशी दिवसभर चर्चा होती. या बाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता या बाबत अजून कोणतेही पत्र आले नसल्याचे उत्तर मिळाले. आणखी किमान आठवडाभर तरी वाढीव मुदत मिळावी, अशी मागणी होत आहे. खरीप पेरणीनंतर पीकविमा भरणा करण्यास सुरुवात होते. गतवर्षी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना यंदा जून महिन्यात मिळाली. या आधी पीकविमा भरणे शेतकरी टाळत होते. मात्र, गतवर्षी खरीप हंगामात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्यानंतर मोठय़ा संख्येने शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. भरलेल्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी लागणारे निकष गतवर्षी पूर्ण झाले होते. भांडून का होईना, परंतु विमा कंपनीने या वर्षी विम्याची रक्कम वाटप केली.
यंदा मागील वर्षांसारखीच दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम पूर्णत: नष्ट झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पटापट पीकविमा भरण्यास प्रारंभ केला. या वर्षी अधिक संख्येने शेतकरी पीकविमा भरत होते. राष्ट्रीय कृषी विमा कंपनीने बँकांना या बाबत निर्देश दिले होते. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. पीकविमा भरून घेण्यास मोठय़ा बँकांनी नकार दिला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडे धाव घेतली. जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या मदतीला धावली. बँकेच्या सर्व शाखांमध्ये पीकविमा भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. परंतु सर्वच गावांत या बँकेच्या शाखा नाहीत आणि जेथे आहेत तेथे शेतकऱ्यांची संख्या मोठी, तसेच अपुरे कर्मचारी व पीकविमा भरून घेण्यास झालेला उशीर यामुळे जिल्हा बँक शाखेत शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती.
शुक्रवारी पीकविमा भरण्याची अंतिम मुदत होती. जिल्हा बँकेच्या सर्वच शाखांमध्ये गर्दी ओसंडून वाहत होती. पहाटेपासून शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या. मात्र, अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिले. मुदत संपल्याने या शेतकऱ्यांना पीकविमा भरता आला नाही. दिलेल्या मुदतीत बँकेत झालेली गर्दी, शेतीची कामे व तलाठय़ांकडून अडवणूक यामुळे विमा भरण्यास अनेकांना उशीर झाला.
बीडमध्ये ३५ कोटींचा भरणा
वार्ताहर, बीड
राष्ट्रीय पीकविमा योजनेंतर्गत मागील वर्षी साडेतीनशे कोटींचा पीकविमा मंजूर झाला. त्यामुळे यंदा दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात पीकविमा भरला. पीकविम्यापोटी गुरुवापर्यंत साडेपंचवीस कोटी रुपये हप्ता भरणा झाला.
यंदा विमा कंपनीने कापसासह सर्वच पिकांच्या विम्या हप्त्यांत तिपटीने वाढ केली असली, तरी खरीप क्षेत्रावरील पावसाअभावी होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी, या साठी शेतकऱ्यांनी बँकांच्या दारात रांगा लावून विमा उतरविला. ३१ जुल शेवटची मुदत असल्याने आणखी जवळपास १० कोटींपेक्षा जास्त विमा रक्कम भरली जाण्याची शक्यता आहे. मागच्या तुलनेत यंदा जास्तीच्या शेतकऱ्यांनी विमा भरला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाला नसíगक आपत्तीत नुकसानभरपाईचे संरक्षण मिळावे, या साठी राष्ट्रीय कृषी पीकविमा योजना सुरू केली. योजनेंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीने पिकांची नुकसानभरपाई काढून शेतकऱ्यांना विमा रक्कम दिली जाते. मागच्या काही वर्षांत पीकविम्याची चांगली रक्कम शेतकऱ्यांना मिळू लागल्याने पीकविमा भरण्याकडे कल वाढला. मागील वर्षी ३२ कोटींचा पीकविमा शेतकऱ्यांनी उतरविला. या बदल्यात जवळपास साडेतीनशे कोटी विमा कंपनीने मंजूर करून वाटपासाठी दिला.
सलग तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती असताना, तसेच या वर्षीही जूनमध्ये वेळेवर येऊन गायब झालेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रसंगी व्याजाने पसे काढून बँकेच्या दारात गर्दी केली आहे. ३१ जुलपर्यंत पीकविमा भरण्यासाठी मुदत देण्यात आली. ३० जुलपर्यंत जवळपास साडेपंचवीस कोटी रुपये शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या विम्यासाठी भरले आहेत. शेवटच्या दिवशी सर्वच बँकांच्या दारासमोर सकाळपासूनच रांगा लागल्याने १० ते १२ कोटींचा भरणा होईल, असा अंदाज आहे.
दुष्काळी स्थितीत पेरलेले बियाणे, खताचा खर्च तरी निघावा, या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. जिल्हा बँकेच्या अनेक शाखांमध्ये एकाच वेळी पाच टेबलची व्यवस्था पीकविमा भरून घेण्यासाठी करण्यात आली. गुरुवापर्यंत २५ कोटी ५५ लाख ५१ हजार रुपयांचा पीकविमा भरणा झाला. यात जिल्हा बँक, मराठवाडा ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, हैदराबाद बँक, कॅनरा बँक यांचा समावेश आहे. मागील वर्षी मिळालेल्या साडेतीनशे कोटी पीकविम्यापकी जुलअखेर दीडशे कोटींचे वाटप झाल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा