Haryana Election Result 2024 Sanjay Raut Remark on Congress : “कोणीही स्वतःला मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ समजू नये”, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. तसेच, “हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, कारण इथे शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख) व उद्धव ठाकरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख) यांच्यासारखे जागृत नेते आहेत”, असंही राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसारमाध्मांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “देशात काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी तशी जाहीर भूमिका घ्यावी. त्यांनी तशी भूमिका घेतली तर इतर पक्ष देखील त्यांच्या भूमिका घेतील”.

संजय राऊत म्हणाले, “ज्या राज्यात काँग्रेस कमकुवत असेत तिथे ते इतर प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी करून निवडणूक लढतात आणि ज्या राज्यात काँग्रेसला वाटतं की इथे आपण मजबूत आहोत, इथे आपली हवा आहे, तिथे ते इतर पक्षांना, आपल्या सहकाऱ्यांना दूर ठेवतात. त्यामुळे हरियाणासारखे निकाल लागतात. हरियाणाच्या निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून सामोरे गेलो असतो तर या निकालात बदल दिसला असता. इंडिया आघाडीला बहुमत मिळालं असतं. काँग्रेसच्या नऊ जागा कमी पडल्या. हा फार मोठा फरक नाही. अर्थात या निकालाने आम्ही निराश झालेलो नाही. परंतु, काँग्रेसला एक भूमिका घ्यावी लागेल. अनेक राज्यात निवडणुका होणआर आहेत. तिथे काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी तशी भूमिका घ्यावी. मग त्या त्या राज्यातील इतर प्रादेशिक पक्ष आपापल्या भूमिका घेतील”.

हे ही वाचा >> हरियाणानंतर आता मोदींचं मिशन महाराष्ट्र; राज्यातील विविध प्रकल्पांंच्या उद्घाटनात म्हणाले…

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “हरियाणातील पराभव दुर्दैवी आहे. हरियाणात इंडिया आघाडी म्हणून लढायला हवं होतं. कदाचित वेगळे निकाल लागले असते. काँग्रेसने समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांबरोबर आघाडी करून निवडणूक लढवायला हवी होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून निश्चितच इंडिया आघाडी जिंकली असती. काँग्रेसला वाटलं की आम्ही एकतर्फी ही निवडणूक जिंकू, आम्हाला कोणाची गरज नाही. अनेक एक्झिट पोल्सही तसंच सांगत होते. हरियाणात भाजपाचा विजय होईल असं सागणारी एकही व्यक्ती किंवा पत्रकार मला भेटला नाही. तरीदेखील काँग्रेसला हा पराभव पाहावा लागतोय, हे दुर्दैवी आहे. यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. त्यामुळे कोणीही स्वतःला मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ समजू नये. तसेच लोकसभेचं यश हे इंडिया आघाडीचं यश आहे हे लक्षात घ्यावं.