राजस्थानच्या राजकारणातलं महत्त्वाचं नाव म्हणजे सचिन पायलट. सचिन पायलट आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातले मतभेद मागच्या पाच वर्षात अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. अशात सचिन पायलट यांनी एक वक्तव्य केलं आहे त्यामुळे या दोघांमधले मतभेद मिटल्याची चर्चा राजस्थानमध्ये सुरु झाली आहे. राजस्थानच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार आहेत. त्या निवडणुकीत आम्हाला एकत्र येऊन लढायचं आहे असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे सचिन पायलट यांनी?

“अशोक गेहलोत हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न माझा होता. गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याही प्रयत्न सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचाच आहे. त्यांच्याबरोबर माझे जे काही मतभेद होते ते काही फार मोठे नाही. आमच्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे आणि लोकांचं हित महत्त्वाचं आहे. त्यामुळे या गोष्टी पक्षात होत असतात. कायमचं कुणाशी शत्रुत्व नसतं. व्यक्ती म्हणून शत्रुत्व नसतं विरोध हा मुद्द्यांवर केला जातो” असं आता पायलट यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले आहेच सचिन पायलट?

“मी माझं म्हणणं पक्षाच्या समोर मांडलं आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मला हे सांगितलं की आत्तापर्यंत ज्या गोष्टी झाल्या त्या विसरुन सोडून दिल्या पाहिजेत. खरगे हे अनुभवी नेते आहेत त्यांचं ऐकणं माझं काम आहे. कारण त्यांनी मला सल्लाही दिला आहे आणि दिशाही दिली आहे. आपल्याला सकारात्मक विचार घेऊन पुढे जायचं आहे.” असंही सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.

मी राजकीय मर्यादा ओलांडलेल्या नाहीत

“माझ्यावर जे संस्कार आहेत ते मला मोठ्यांचा आदर करणं शिकवतात. मी जो राजकीय विचार करतो त्याला अनुसरुन मी हे सांगतो आहे की मी कधीही कुणाविषयी अशी भाषा वापरलेली नाही जी मला माझ्या बाबत ऐकायला आवडणार नाही. राजकारणात शब्द खूप जपून वापरायचे असतात. टीकाही विचारपूर्वक करायची असते. मी माझ्या सीमेत राहून टीका केली आहे. मला पश्चात्ताप वाटेल असं मी कधीही बोललेलो नाही. माझे पक्षात सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. जर कुणाशी मतभेद असले तरीही ते वैचारिक पातळीवर आहेत. राजकीय पातळीवर आहेत पण व्यक्तिगत पातळीवर कुणाशीही मतभेद नाहीत. आपण जे काही काम करतो आहे ते लोकांसाठी करतो आहे. व्यक्तीगत तिरस्काराला राजकारणात आणि समाजकारणात काहीही स्थान नाही. जे माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यांचा मी कायमच आदर केला आहे. मी कधीही मर्यादा ओलांडून राजकारण केलेलं नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Has the differences between sachin pilot and ashok gehlot been resolved pilot statement triggers disscussion scj