आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर करण्यासाठी एकेका नगरसेवकांना ३५ लाख रुपये दिल्याचं विधान केले. यानंतर त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना यावर प्रश्न विचारण्यात आला. यावर मुश्रीफ यांनी सावध पवित्रा घेतला आहे. मी राजकीयदृष्ट्या त्यांच्यासोबत असलो तरी या कृतीच्या वेळी मी त्यांच्यासोबत नव्हतो, असं मत हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी (१६ डिसेंबर) व्यक्त केलं.
गेल्या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे यांनी कोल्हापूर महापालिकेत महापौर करण्यासाठी एकेका नगरसेवकाला ३५ लाख रुपये दिले होते, अशी आठवण सांगितली. तसेच ती माझी राजकीय चूक होती अशी कबुलीही दिली होती. याशिवाय तेव्हा महापालिकेच्या राजकारणात माझ्यासोबत हसन मुश्रीफ होते, तर विरोधात महादेवराव महाडिक व सतेज पाटील होते, असेही त्यांनी सांगितले होते. या विधानानंतर कोल्हापुरात राजकीय पडसाद उमटत आहेत.
कोरे यांच्या विधानाकडे आज लक्ष वेधले असता मंत्री हसन मुश्रीफ यांनी तेव्हा कोरे यांच्यासोबत राजकीयदृष्ट्या एकत्र होतो, पण पैशाचे व्यवहार करताना नव्हतो, असे मत व्यक्त केले. तसेच या उलाढालीपासून स्वतःला दूर केले. तसेच कोरे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जात असल्याचा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
कोल्हापूर शहर व परिसरात गवा येण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत मुश्रीफ यांनी गवा बेशुद्ध करून सुरक्षितपणे जंगलात सोडण्याची गरज आहे, असा उल्लेख करून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाशी चर्चा केली असल्याचे नमूद केले.