राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमुळे महाविकास आघाडीतले घटकपक्ष अस्वस्थ आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांकडे हा संभ्रम दूर करून भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतला संभ्रम स्पष्ट जाणवतोय. अजित पवार यांच्या गटातले नेते सातत्याने शरद पवाराची भेट घेत आहेत, त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. परंतु, दोन्ही गटातले कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय वडेट्टीवार म्हणाले, “शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे आहेत. त्यामुळे या भेटीनंतर संभ्रम संभ्रम असं म्हणण्याचं काही कारण नाही. शरद पवार त्यांची भूमिका स्पष्ट करतील. सर्वांनी काही काळ धीर धरला पाहिजे. मी या भेटीने संभ्रम निर्माण झालाय असं म्हणणार नाही. या भेटीत कुणाची तरी गरज आहे, ही गरज जो भेटायला जातो त्याचीच असते. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर शरद पवारांना बरोबर घ्यावंच लागेल. शरद पवार अजित पवारांबरोबर आले नाहीत, तर अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचं केवळ स्वप्नच बघत रहावं लागेल, असं कदाचित भाजपाने म्हटलं असेल. म्हणून हा सत्तेसाठी सुरू असलेला खटाटोप आहे,”

हे ही वाचा >> “…अन् अजित पवार टुणकन तिकडे गेले”; राज ठाकरेंचा टोला, म्हणाले, “पंतप्रधानांनी…”

विजय वडेट्टीवारांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली असताना यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे विचारणा केली. त्यावर मुश्रीफ म्हणाले, याबद्दल तुम्ही वडेट्टीवारांनाच विचारा. मुश्रीफांच्या उत्तरानंतर शरद पवार तुमच्याबरोबर येणार आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले, आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही जाऊन त्यांना भेटून आलो. शरद पवार यांना आम्ही साकडं घातलं आहे. त्यांनी आमच्याबरोबर यावं अशी आमची इच्छा आहे. आमचं कुटुंब एकच आहे, राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहे. राज्याच्या विकासासाठी आम्ही भाजपाबरोर आलो आहोत. सरकारला डबल इंजिन लावल्यामुळे अधिक वेगाने विकास होतोय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif answer on will sharad pawar come with ajit pawar and bjp asc