Hasan Mushrif on Devendra Fadnavis Oath Ceremony Advertisement : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं आहे. त्यानंतर महायुतीने काल (५ डिसेंबर) निवडणुकीच्या निकालानंतर १२ दिवसांनी राज्यात सत्तास्थापन केली. मुंबईतील आझाद मैदानावर भाजपा नेते व नागपूर दक्षिणचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे (शिंदे) प्रमुख तथा कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे आमदार एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) प्रमुख तथा बारामतीचे आमदार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशपासून आंध्र प्रदेशपर्यंत वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. शपथविधीसाठी राज्य शासनाने मोठा भव्यदिव्य सोहळा आयोजित केला होता. या शपथविधीचं अनेक मान्यवरांसह राज्यातील जनतेलाही निमंत्रण होतं.
भारतीय जनता पार्टीने या शपथविधी सोहळ्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. सर्व वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि समाजमाध्यमांवर या जाहिराती झळकल्या. मात्र, काही भाजपा समर्थकांनी व माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला. या जाहिरातीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आहिल्याबाई होळकर या महान व्यक्तींचे फोटो आहेत. त्यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे फोटो होते. तसेच, शपथ घेणारे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे देखील फोटो होते. मात्र यावर, राजर्षी शाहू महाराजांचा फोटो नसल्यामुळे माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच, भारतीय जनता पार्टी ज्यांच्या विचारांवर चालते, ज्यांना आदर्श मानते त्या वीर सावरकरांचाही फोटो जाहिरातीत नसल्यामुळे अनेक भाजपा समर्थक व सावरकरप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती.
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत शिंदेंच्या शिवसेनेकडून सरकारची भूमिका स्पष्ट
भाजपाच्या जाहिरातीवर संभाजी छत्रपती संतापले
माजी खासदार संभाजी छत्रपती म्हणाले, “भारतीय जनता पार्टीच्या जाहिरातीत अनेक थोर महापुरुषांचा फोटो आहे मात्र त्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा फोटो नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्र घडवण्यात छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचं मोठे योगदान आहे. मात्र त्यापैकी शाहू महाराजांना बाजूला करून भारतीय जनता पार्टीने ही जाहिरात दिली आहे. ही न पटणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रात असले प्रकार चालणार नाहीत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत शाहू महाराजांचं महत्त्वाचं स्थान आहे. परंतु, शाहू महाराजांना बाजूला ठेवायचं आणि केवळ इतर महापुरुषांचं नाव घ्यायचं हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रात हे खपवून घेतलं जाणार नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही. भारतीय जनता पार्टीने त्यांची चूक दुरुस्त करावी अशी मी त्यांना विनंती करतो”.
हे ही वाचा >> “शपथविधीअगोदर खूप मीम्स आले, आम्ही तिघे…”, फडणवीसांनी सांगितलं ट्रोलर्सचं आवडतं मीम; अजित पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
हसन मुश्रीफांची दिलगिरी
दरम्यान, या जाहिरातीप्रकरणी सरकारच्या वतीने हसन मुश्रीफ यांनी माफी मागितली आहे. हसन मुश्रीफ यांनी काही वेळापूर्वी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “मी ती जाहिरात पाहिली. ते पाहून मला असं वाटतंय की अनावधानाने राजर्षी शाहू महाराजांचा फोटो त्या जाहिरातीत छापणं राहून गेलं असेल. त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. राजर्षी शाहू महाराजांना टाळून जाहिरात करणे किंवा शपथविधी करणे असला विचारही आमच्या मनात आला नाही आणि येणारही नाही. कदाचित त्यांचा फोटो चुकून राहून गेला असेल त्याबद्दल मी शासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो.