राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाली आणि पक्षात उभी फूट पडली. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज व ज्येष्ठ नेते अजित पवारांबरोबर गेले. मात्र, अशा परिस्थितीतही जयंता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राहणं पसंत केलं. असं असलं तरी काही दिवसांपासून जयंत पाटीलही अजित पवार गटाबरोबर जाण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील नेते हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे. ते शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) माध्यमांशी बोलत होते.
हसन मुश्रीफ म्हणाले, “जयंत पाटील यांनीही आमच्याबरोबर शपथ घेतली असती. आता मी इतिहास सांगत बसत नाही. ते गोपनीय आहे. मात्र, आज आम्ही ज्या पक्षाबरोबर गेलो आहे त्याच्याशी इमान ठेवणं आणि त्यांच्यासाठी जीवाचं रान करणं हा माझा स्वभाव आहे. आता आम्ही भूमिका बदलली आहे. त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे.”
“जयंत पाटील एका घटनेमुळे तिकडे थांबले”
“जयंत पाटील एका घटनेमुळे तिकडे थांबले. ती घटना मी माध्यमांना सांगणार नाही. ती घटना मी नंतर कधीतरी सांगेन. कारण मी नीतीमुल्ये पाळणारा माणूस आहे,” असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी सूचक विधान केलं.
हेही वाचा : “माझ्यावर मागून दबाव आला आहे”, शरद पवारांसमोर जयंत पाटलांचं वक्तव्य अन्…
मोदींच्या शरद पवारांवरील टीकेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर
दरम्यान, शिर्डीतील आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्या टीकेला आता जयंत पाटील यांनी मोदींचाच एक व्हिडीओ पोस्ट करत उत्तर दिलं आहे.
किती हा विरोधाभास! आदरणीय शरद पवार यांनी ६० वर्षांत शेतकर्यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती. अशी X पोस्ट जयंत पाटील यांनी केली आहे. त्या पोस्टवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा : “…त्यामुळे आता त्यांचे परतीचे दोर कापण्यात आले आहेत”, शरद पवारांसमोर जयंत पाटलांचं मोठं विधान
जयंत पाटील यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत मोदी काय म्हणताना दिसत आहेत?
“क्रिकेटच्या निमित्ताने माझी आणि शरद पवारांची भेट व्हायची. क्रिकेट बद्दल जर आम्ही आठ मिनिटं बोललो तर पाच मिनिटं ते शेतकऱ्यांचा विषय काढायचेच. चर्चा क्रिकेटवरुन सुरु व्हायची, पण शरद पवार शेतकऱ्यांच्या विषयावर यायचे. त्यांच्या डोक्यात सातत्याने गाव, शेतकरी आणि शेतीत आधुनिकता कशी आणता येईल हा विचार असतो. तंत्रज्ञान कसं आणता येईल? या गोष्टींवर ते भर द्यायचे. शेतीकडे फक्त पारंपरिक पद्धतीने न पाहता आधुनिक पद्धतीने पाहिलं गेलं पाहिजे हा त्यांचा स्वभाव मला दिसला. तुम्ही आत्ताही त्यांना भेटा आणि उस इतका शब्द त्यांच्यापुढे उच्चारा ते एक तास तुमच्याशी या विषयावर बोलू शकतात. सगळ्या संख्या त्यांच्याकडे असतात. यावरुन हेच दिसतं की शरद पवार यांचं सार्वजनिक जीवन हे फक्त पद आणि प्रतिष्ठेशी जोडलेलं नाही. शेतकऱ्यांच्या भलाईसाठी काहीतरी नवं करण्याचा त्यांचा अविरत प्रयत्न त्यांनी केला.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना दिसत आहेत. हाच व्हिडीओ पोस्ट करत जयंत पाटील यांनी किती हा विरोधाभास असं म्हणत उत्तर दिलं आहे.