“किरीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचा एक पैसा मिळवल्याचं जरी सिद्ध केलं तरी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू,” असे प्रतिआव्हान राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी (१ एप्रिल) दिले. कागल तालुक्यातील करनूर येथे विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन कार्यक्रमावेळी घेतलेल्या जाहीर सभेत मुश्रीफ बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय घाटगे होते.
हसन मुश्रीफ म्हणाले, “मी जनतेला जाहीरपणे शपथेवर सांगू इच्छितो की, सोमय्या यांनी माझ्यावर सात महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. त्यामधून काहीच निष्पन्न झालेले नाही. आज कोल्हापूर विधान उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागल्यानंतर ते पुन्हा तक्रार करीत आहेत. निश्चितच हा काही विशेष योगायोग नाही.”
“कोल्हापूर-कागलच्या मंडळींचे सीडीआर तपासा”
“काही कोल्हापूरच्या मंडळींचे, आमच्या काही कागलच्या मंडळींचे सीडीआर तपासा म्हणजे तुमच्या लक्षात येईल याच्यामागे निश्चित कोण आहे?”, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी नामोल्लेख न करता चंद्रकांत पाटील, समरजित घाटगे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला.
हेही वाचा : ‘मविआ’ला पाठिंबा देण्यामागच्या एमआयएमच्या चालीचा अभ्यास केला जाईल – हसन मुश्रीफ
“…तोपर्यंत कुणीही माझा केसही वाकडा करू शकत नाही”
“गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत कुणीही माझा केसही वाकडा करू शकत नाही. ‘मुद्दही लाख बुरा चाहे, तो क्या होता है; वही होता है, जो मंजुरे खुदा होता है’! गेली ३०-३५ वर्षे सर्वसामान्य, उपेक्षित, वंचित व गोरगरीब जनतेचा आशीर्वाद व पाठबळ या जोरावरच मी ही जनकल्याणाची पताका घेऊन चालत आलो आहे,” असंही मुश्रीफ यांनी नमूद केलं.