महाराष्ट्रात एकीकडे शरद पवारांनी अजित पवारांबाबत केलेल्या विधानावरून तर्क-वितर्क चालू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्याच दोन्ही गटातील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या शरद पवारांच्या सभेत गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांबरोबर गेलेल्या नेत्यांवर टोलेबाजी केली होती. त्यावरून आता हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाडांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाडांनी या सभेत केलेल्या भाषणातून अजित पवार गटाला कोल्हापुरी चपलेची आठण करून दिली. “महाराष्ट्रात आता गद्दारी दिसू लागली आहे. हे साप बिळात होते. बिळातले साप आता बाहेर पडू लागले आहेत. या सापांना ठेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे या कोल्हापुरात सर्वात प्रसिद्ध काय आहे? पायतान! या पायतानाचा उपयोग अख्या महाराष्ट्राने करावा अशी माझी इच्छा आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

“आज कोल्हापुरातल्या सगळ्या वस्तादांना भेटायला आमचा वस्ताद आला आहे. आमचा वस्ताद लय भयंकर आहे. त्यांनी जर कोणाला कुस्तीचं आव्हान दिलं तर समोरच्या पैलवानाची अवस्था बिकट होते”, असंही ते शरद पवारांना उद्देशून म्हणाले.

“बिळातले साप बाहेर पडलेत, त्यांना कोल्हापुरी पायतानाने…”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

हसन मुश्रीफांचं प्रत्युत्तर

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या या विधानाबाबत माध्यमांनी हसन मुश्रीफ यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावरून खोचक प्रत्युत्तर दिलं. “जितेंद्र आव्हाड हे मला फार ज्युनिअर आहेत. त्यांनी शरद पवारांवर काय जादू केली हे मला माहिती नाही. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याचं काम त्यांनी केलं आहे. अशी भाषा त्यांनी बोलायला नको होती”, असं मुश्रीफ म्हणाले.

“जेव्हा एकनाथ शिंदे सगळे आमदार घेऊन गुवाहाटीला गेले, तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहिलं होतं की आम्हालाही सत्तेत जाण्याची परवानगी द्या. म्हणजे गृहनिर्माण खातं किती ह्रदयाला कवटाळून बसले होते हे. मग केव्हा कुठे गेला होता दादा तुझा धर्म? तेव्हा कशी सही केली होती तुम्ही? कोल्हापुरात कोल्हापुरी चप्पल नाही, कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती करकर वाजते. ती बसली की कळेल त्याला”, असा टोला यावेळी हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif mocks ncp leader jitendra awhad on kolhapur speech pmw