कोल्हापूरमधील माजी आमदार के.पी. पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या चर्चा सुरु असतानाच के.पी. पाटील हे अध्यक्ष असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. मात्र, उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईचा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी निषेध करत नाराजी व्यक्त केली आहे. “के.पी. पाटील हे महाविकास आघाडीकडे जात आहेत म्हणून जर ही कारवाई करण्यात येत असेल तर मग त्यांच्या घरावरच ईडी किंवा इनकम टॅक्सचा छापा टाकायला हवा होता”, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी महायुती सरकारमधील उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांना खडेबोल सुनावले.
हसन मुश्रीफ काय म्हणाले?
“के.पी.पाटील अध्यक्ष असलेल्या कारखान्यावर जी कारवाई करण्यात आली. त्या कारवाईचा मी निषेध करतो. के.पी. पाटील हे महाविकास आघाडीकडे जात आहेत त्यामुळे तुम्ही ही कारवाई करत असताल तर मग त्यांच्या घरावरच ईडी किंवा इनकम टॅक्सचा छापा टाकायला हवा होता. मात्र, ६५ हजार सभासदांच्या मालकीच्या कारखान्यावर अशा प्रकारची कारवाई करणं हे आम्हाला आवडलेलं नाही. आम्ही याचा तीव्र निषेध करतो”, असं हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
हेही वाचा : “मराठा आंदोलन भरकटलंय”, वरिष्ठ भाजपा नेत्याचं वक्तव्य; मनोज जरांगे संतापून म्हणाले, “तुमच्यासारख्यांमुळे…”
मुश्रीफ पुढे म्हणाले, “के.पी. पाटील यांच्या मालकीचा हा कारखाना नाही. हा ६५ हजार सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे राजकारण करून कधीही राजकारणात यशस्वी होता येत नाही. यामुळे के.पी. पाटील यांना सहानुभूती जास्त मिळेल. मात्र, ही पद्धत योग्य नाही. कारण हा सभासदांचा कारखाना आहे. मी संबधित विभागाच्या मंत्र्यांशी बोलणार आहे. अशा पद्धतीने सहकारी कारखान्याला घालवणं बरोबर नाही. तुम्हाला व्यक्तिगत कारवाई करायची असेल तर के.पी. पाटील यांच्यावर करावी. पण अशा पद्धतीची कारवाई योग्य नाही. उत्पादन शुल्क विभागाने ज्या पद्धतीने कारवाई केली, त्यामध्ये संशयाला जागा आहे”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
शक्तिपीठ महामार्गाबाबत काय म्हणाले?
हसन मुश्रीफ कोल्हापूरमधील शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलताना म्हणाले की, “शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिलेली आहे. यासंदर्भातील सूचना त्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांवर आम्ही हा प्रकल्प लादणार नाही, असा शब्द त्यांनी दिला आहे. आता स्थगिती देण्यात आली असली तरी आम्ही हा प्रकल्प रद्द करण्यासाठी यशस्वी होऊ”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.