Hasan Mushrif On Dhananjay Munde: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. यावर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेला आज २१ दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत, तर काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. त्यामुळे फरार आरोपींना अटक करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा देखील काढण्यात आला. तसेच फरार आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या घटनेत वाल्मिक कराड यांचाही सहभाग असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तर मंत्री धनजंय मुंडे यांच्यावरही विरोधकांकडून टीका करण्यात येत असून त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधी पक्षाकडून होतं आहे. दरम्यान, विरोधकांच्या मागणीवर बोलताना हसन मुश्रीफ यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात भाष्य केलं आहे. जोपर्यंत कोणी दोषी आढळत नाही तोपर्यंत राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Amol Kolhe on Prajakta Mali: प्राजक्ता माळी – सुरेश धस यांच्या वादात अमोल कोल्हे म्हणाले, “शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न…”

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

“आमदार सुरेश धस यांनी जे आरोप केले आहेत. त्या आरोपावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलेलं आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी असतील त्याला तुम्ही शिक्षा द्या, अशी स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडलेली आहे”, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. भाजपा टार्गेट करतंय असं वाटतं का? या प्रश्नांवर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, “अशातला काही प्रश्न नाही. जे योग्य असेल त्याची चौकशी व्हायला काहीही हरकत नाही. देवेंद्र फडणवीस हे अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. गृहखातंही त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ते या घटनेत कारवाई करतील.”

हसन मुश्रीफ धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाले?

संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. वाल्मिक कराड यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे, तर वाल्मिक कराड यांना मंत्री धनजंय मुंडे हे वाचवत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. दरम्यान, यावरून मंत्री धनजंय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधक करत आहेत. यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलताना मुश्रीफ यांनी म्हटलं की, “मी अनेकवेळा सांगितलं की जोपर्यंत कोणी दोषी आढळत नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची आवश्यकता नाही”, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने वाल्मिक कराडला संरक्षण मिळत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला आरोपी करण्याच्या मागणीसह धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी बीडमध्ये काढण्यात आलेल्या मूक मोर्चातून विरोधकांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif on dhananjay munde resignation and santosh deshmukh murder case in beed politics and morcha gkt