राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येऊन आता जवळपास अडीच वर्ष उलटलं आहे. तरीदेखील विरोधकांकडून सातत्याने सरकार पडणार असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, दुसरीकडे अडीच वर्ष उलटल्यानंतर देखील २०१९मध्ये सत्तास्थापनेवेळी महाराष्ट्रात झालेलं महानाट्य कुणीही विसरलेलं नाही. २०१९च्या ऑक्टोबर महिन्यात खूप साऱ्या घडामोडी घडत होत्या. त्यावेळचा एक किस्सा नुकताच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका कार्यक्रमात सांगितला आहे. “बाहेर बघितलं तर पाऊस आणि टीव्ही लावला की संजय राऊत, असं समीकरण झालं होतं”, असं हसन मुश्रीफ म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“वाटलंच नव्हतं पुन्हा सत्ता येईल”

इस्लामपूर मधील पंचायत समितीतील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळयाचं अनावरण हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी आपल्याला २०१९च्या निवडणुकांनंतर वाटलंच नव्हतं की पुन्हा सत्ता येईल, असं म्हटलं आहे. “२०१९ साली विधानसभा निवडणुका झाल्या. भाजपाचे १०५ आणि शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले. त्यांची निवडणूक पूर्व युती होती. आपल्याला वाटलंच नव्हतं की पुन्हा आपली सत्ता येईल. पुन्हा एकदा पाच वर्ष विरोधी पक्षात बसावं लागेल, अशीच आपली धारणा होती. पण नीतीला हे मान्य नव्हतं”, असं मुश्रीफ म्हणाले.

हसन मुश्रीफांनी सांगितली तेव्हाची आठवण…!

“ऑक्टोबर २०१९मध्ये फार मोठा पाऊस पडत होता. आम्ही काही मुंबईला गेलो नव्हतो. कारण कळालं होतं की आपण विरोधी पक्षात बसणार आहोत. पण तेव्हा बाहेर बघितलं की पाऊस आणि टीव्ही लावला की संजय राऊत असं समीकरण झालं होतं”, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी मिश्किल टिप्पणी केली.

“संजय राऊतांनी आता एकांतात…”, राज ठाकरेंचा खोचक सल्ला; नकलांबाबत मारलेल्या टोमण्यावर दिलं प्रत्युत्तर!

“मी त्याच दिवशी शपथ घेतली, की…”

“तेव्हा सुरू झालं होतं की शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द भाजपानं पाळला नाही, म्हणून पवार साहेबांच्या चाणक्यनीतीनं आणि जयंत पाटलांच्या सहकार्यानं या राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आली. जयंत पाटील यांनी ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्याच दिवशी मी शपथ घेतली, की आर. आर. पाटील आणि जयंत पाटील यांनी ग्रामविकास खात्याचा अत्यंत चांगला कारभार केला होता. त्यांचा आदर्श ठेवून मी काम करेन. ३४ हजार ग्रामपंचायती, ५३० पंचायत समित्या, ३४ जिल्हा परिषदा आहेत. हा प्रचंड कारभार आहे”, असं देखील नवाब मलिक म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif on mah government formation drama sanjay raut press conference pmw