एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यांना आताच याचा साक्षात्कार का झाला आहे? यामागे काही चाल आहे का; याचा अभ्यास केला जाईल, असं ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार तीन चाकी आहे. त्यांनी आमचा पाठिंबा घेऊन चार चाकी गाडी करावी, अशी हाक राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घातली आहे. त्यांच्या या विधानावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, आजपर्यंत आम्ही कधीच एमआयएमचा पाठिंबा घेतला नाही. त्यांना पाठिंबा देण्याचा आत्ताच का साक्षात्कार झाला आहे? यामागे कोणाची काही चाल आहे का, हे तपासले पाहिजे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांचा पाठिंबा घेण्याचा निर्णय आघाडीच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल.
हेही वाचा – राज्यात नवी समीकरणं जुळणार? एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिली ‘ही’ ऑफर!
खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, राजू शेट्टी यांच्या प्रामुख्याने दोन मागण्या आहेत. त्यातील नियमित पिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय अर्थसंकल्प घेतला आहे. तर शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याबाबत शासनाने समिती नेमली आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजू शेट्टी हे महाविकास आघाडी वर नाराज नाहीत. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचा संघर्ष सुरू आहे. भाजपला पाठिंबा दिला असतानाही त्यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नी अशीच संघर्षाची भूमिका होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.