राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर जात आहेत. कोल्हापुरातील दसरा चौकात शरद पवारांची सभा होणार आहे. या सभेतून शरद पवार अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. या सभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पक्षाला संपवण्यामध्ये काही नेत्यांचाच हात असावा, असं आता कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.
शिवाय कोल्हापुरातील उद्योग जगताला स्थानिक नेत्यांचा त्रास आहे. त्यामुळे तेथील उद्योग विस्तार करायला घाबरत आहेत, असंही रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांच्या टीकेला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवार यांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे, असं मला वाटतं. त्यांनी कुटुंबाचा वाद वाढवण्याऐवजी मिटवायला हवा, असं मुश्रीफ म्हणाले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “काय खोटारडा माणूस आहे”, फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया
रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले, “रोहित पवार हे फार नवीन आणि नवखे आहेत. ते कशासाठी एवढं मोठं धाडस करतायत, तेच मला कळत नाही. बहुतेक अजित पवारांची जागा त्यांना घ्यायची आहे, असं मला वाटतं. कुटुंबाचा वाद त्यांनी मिटवायला हवा. वाढवला नाही पाहिजे. कदाचित त्यांना माहीत नसेल, पण यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात आमचे पाच आमदार होते. आता दोन निवडून आलेत. पुण्यातही अनेकदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.”
हेही वाचा- “थोडं भरकटलो होतो, आता ती चूक…”, ठाकरे गटात प्रवेश करताच शिवसेनेच्या माजी खासदारानं मागितली माफी
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
हसन मुश्रीफांवर टीका करताना रोहित पवार म्हणाले, “काही स्थानिक नेते, त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते कोल्हापुरातील उद्योग जगतातील लोकांना त्रास देत आहेत. त्यामुळे तेथील लोक आम्हाला म्हणतात की, आम्हाला उद्योग वाढवायचा आहे, दुसरं एखादं ठिकाण सांगा. त्यावर आम्ही त्यांना सांगतो की, कोल्हापुरातील तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही तिथेच उद्योगाचा विस्तार का करत नाहीत? त्यावर ते म्हणतात, येथे स्थानिक स्तरावर आम्हाला प्रचंड त्रास आहे. येथील नेत्यांकडून हस्तक्षेप केला जातो. त्यामुळे आम्हाला इथे विस्तार करायला भीती वाटते.”