उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. आपला वाढदिवस साजरा करण्याऐवजी इर्शाळवाडी दरड दुर्घटनाग्रस्तांना मदत करा, असं आवाहन अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आधीच केलं आहे. तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राज्यभरात वेगवेगळ्या चौकांमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसाचे होर्डिंग्स लावले आहेत. या होर्डिंग्सवर अजित पवारांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा करण्यात आला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि त्यांच्या गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील अशाच पद्धतीचं एक ट्वीट केलं आहे. ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व…”, अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि राज्यात अजितपर्व सुरू होईल, असा दावा अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्वीटमधून केल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांना अजित पवारांच्या होर्डिंग्सबाबत (भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेल्या) प्रश्न विचारला. त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले, “फक्त पोस्टर्स लावून कोणीही मुख्यमंत्री होत नाही. त्यासाठी १४५ आमदार लागतात, ही गोष्ट अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना अनेकदा सांगितली आहे.”
हे ही वाचा >> “त्यात एखादा मुसलमान असता तर…”, मणिपूरमधील घटनेवरून संजय राऊतांचा भाजपावर निशाणा
हसन मुश्रीफ म्हणाले, त्यावर भावी मुख्यमंत्री लिहिलं आहे. भावी म्हणजे त्याला किती काळ आहे? दोन जण (देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे) मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. एक अद्याप व्हायचे आहेत. आता नियतीच्या मनात काय आहे हे माहिती नाही. परंतु लोकांच्या तशा अपेक्षा आहेत.